
देवगड : देवगड तालुक्यातील तिर्लोट ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी आज तिर्लोट ग्रामस्थांनी देवगड पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. वारंवार निवेदने, तक्रारी आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांमध्ये कथित आर्थिक अनियमितता, ग्रामसभा न घेता विकासकामे राबविणे, ग्रामसभेची मंजुरी न घेता कामे करणे, कामकाजात पारदर्शकतेचा अभाव तसेच प्रशासनात अनधिकृत हस्तक्षेप होत असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यासह सरपंच रितिका रामकृष्ण जुवाटकर, ग्रामपंचायत अधिकारी घरजाळे तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात सन २०२४ नंतर नियमित ग्रामसभा न घेता विविध विकासकामे करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, काही विकासकामांमध्ये उपठेकेदारांची माहिती नोंदविण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कंत्राटदारांना जीएसटीसह देयके अदा करण्यात आली असली तरी त्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून संपूर्ण आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंचांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप होत असल्याचा तसेच ठेकेदारांकडून कमिशन घेतले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन तसेच ग्रामविकास विभागामार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदने मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, देवगड पंचायत समिती तसेच अन्य संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहेत. मात्र, वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रकरणात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
उपोषणात सहभागी ग्रामस्थ : स्वाती सावंत, तात्या सारंग, भीमसेन भाबल, रविंद्र जुवाटकर, योगिता अनुभवणे, कल्पिता घाडी, शुभांगी अनुभवणे, मानवी बापर्डेकर, विजय अनुभवणे, धर्मेंद्र कडू, कल्पेश घाडी, संदेश घाडी, बिराप्पा येड्डे, कृष्णा घाडी, अंकुश तिर्लोटकर, अजित अनुभवणे, प्रशांत अनुभवणे, अनिल पुजारे, कल्पेश क. घाडी, सुनिल घाडी, प्रशांत अ. घाडी, अनंत म. घाडी, राजेश तिर्लोटकर, गणेश भाबल, मंगेश घाडी, रुपेश घाडी, विजय घाडी, चंद्रकांत अनुभवणे आणि रमेश घाडी यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे.










