
देवगड : देवगड तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. मात्र, यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विलास सालसकर यांनी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची पुरेशी उपस्थिती नसल्याबाबत हरकत घेतली. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, आता २४ जुलै रोजी आरक्षण सोडत होणार असल्याची माहिती तहसीलदार शीतल जाधव यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने सरपंच पदांच्या आरक्षणामध्ये सुधारणा केली असून, त्यानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित अधिसूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेले एक पद कमी करून ते खुल्या प्रवर्गात वाढविण्यात आले आहे. ज्या तालुक्यांमध्ये सरपंच पदांची संख्या अधिक आहे, त्या तालुक्यांमध्ये हा बदल लागू करण्यात येणार आहे.
देवगड तालुक्यात एकूण ७२ ग्रामपंचायती असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात तहसीलदार शीतल जाधव यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या १० ग्रामपंचायतींमधून चिठ्ठी पद्धतीने एक पद वगळून ते खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागरिकांच्या मागास प्रवर्गातील संबंधित सरपंच उपस्थित नसल्याची हरकत शिवसेना तालुकाप्रमुख विलास सालसकर यांनी घेतली. तसेच संबंधित सरपंचांना आरक्षण सोडतीसाठी उपस्थित राहण्याबाबत पूर्वसूचना देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळे शुक्रवारची आरक्षण सोडत रद्द करून ती २४ जुलै रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कार्यक्रमास तहसीलदार शीतल जाधव, नायब तहसीलदार व्ही. व्ही. शेठ, एस. एस. खरात, सी. एस. आखाडे, सहाय्यक महसूल अधिकारी एस. डी. कोयंडे, महसूल सहाय्यक प्रदीप कदम, शिवसेना तालुकाप्रमुख विलास सालसकर, सजाउद्दीन सोलकर, दाभोळेचे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे, कुणकेश्वरचे सरपंच महेश धामणकर, केतन खाडये, अशोक जाधव तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. देवगड तालुक्यातील बुरंबावडे, उंडील, तोरसोळे, मुणगे, गवाणे, दाभोळे, विजयदुर्ग, कातवण, कट्टा आणि शिरगाव या दहा ग्रामपंचायतींपैकी एका ग्रामपंचायतीचे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असलेले आरक्षित सरपंच पद सोडतीद्वारे खुल्या प्रवर्गात रूपांतरित करण्यासाठी ही आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली होती.










