
वेंगुर्ले : तालुक्यातील आडेली ग्रामपंचायत कार्यालय समोरील "कृष्णप्रभा ॲग्रोटेक" या कृषी साहित्य विक्री केंद्रावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत विनापरवाना खते, बियाणे, कीटकनाशके साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ४ लाख २४ हजार ४४ रुपये किमतीची खते, बियाणे, कीटकनाशके जप्त करून कृष्णप्रभा ॲग्रोटेक हे कृषी साहित्य विक्री केंद्र सीलबंद करण्यात आले आहे. तसेच यातील दोषी संजय कृष्णा मडव (रा. कुडाळ) व समीक्षा धुरी यांच्यावर वेंगुर्ले पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वेंगुर्ले तालुक्यात होणाऱ्या विनापरवाना खत, कीटकनाशक, बियाणे विक्री, पुरवठा व वाहतूक याला प्रतिबंध करण्याकरिता रविवार दिनांक १४ जून रोजी सायंकाळी वेंगुर्ला तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) प्रकाश मोहिते, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुशांत भोसले, कृषीसेवक ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी आडेली येथे विनापरवाना कृषी निविष्ठा विक्री होत असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आडेली ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या "कृष्णप्रभा ॲग्रोटेक" या नावाच्या विक्री केंद्रास भेट दिली. दरम्यान विक्री केंद्रात उपस्थित कर्मचारी यांना विक्री केंद्र परवाना बाबत विचारणा केली असता सदर विक्री केंद्र संजय कृष्णा मडव ( रा. कुडाळ) व समीक्षा धुरी यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. याबाबत संजय कृष्णा मडव यांना मोबाईलद्वारे संपर्क केला असता व परवानाबाबत विचारणा केली असता त्यांनी अधिकृत परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे कृष्णप्रभा ॲग्रोटेक आडेली या कृषी निविष्ठा विक्री केंद्रात विनापरवाना खते, बियाणे व कीटकनाशके यांची साठवणूक व विक्री होत असल्याची पुष्टी झाल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत २ लाख ३५ हजार ६३९ रुपये किमतीची ३१६.४६ किलोग्राम कीटकनाशके, १ लाख ७६ हजार ६४० रुपये किमतीची २३३.६० किलोग्राम खते, ११ हजार ७६५ रुपये किमतीची ७४.१० किलोग्राम बियाणी अशी एकूण ४ लाख २४ हजार ४४ रुपये किमतीचा विनापरवाना मुद्देमाल जप्त करत कृष्णप्रभा ॲग्रोटेक हे कृषी साहित्य विक्री केंद्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल श्री गवस तसेच पोलीस पाटील सुशांत नाईक व संजना होडावडेकर यांच्या समक्ष सीलबंद केले.
दरम्यान या प्रकरणी संजय कृष्णा मडव (४६) व समीक्षा धुरी (३५) यांनी आडेली ग्रामपंचायत कार्यालयासमोर विनापरवाना कृषी निविष्ठा खते बियाणे, कीटकनाशके साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास हेड कॉन्स्टेबल योगेश सराफदार हे करत आहेत.










