LIVE UPDATES

'आधार चॅरिटेबल ट्रस्ट'तर्फे गरजूंना कपड्यांचे वाटप

Edited by: दिपेश परब
Published on: June 08, 2026 21:49 PM
views 22  views

वेंगुर्ले : 'मानव सेवा हीच ईश्‍वर सेवा' हा मंत्र जपत, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मातोंड येथील आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नुकतेच परिसरातील गरीब व गरजू महिला आणि पुरुषांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आधार चॅरिटेबल ट्रस्ट, मातोंड ही संस्था नेहमीच समाजातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मदतीसाठी अग्रेसर असते. याच सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून संस्थेने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये गावातील व परिसरातील अनेक गरीब कुटुंबांना कपड्यांचे वाटप करून त्यांना मायेची ऊब देण्यात आली.

या समाजोपयोगी उपक्रमाच्या प्रसंगी आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा विनिता परब, सचिव श्री. स्वप्नील परब, खजिनदार श्री. हर्षल परब आणि संचालक श्री. बाळा परब यांच्यासह संस्थेचे इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. कपडे वाटपाच्या या उपक्रमानंतर उपस्थित लाभार्थी महिला व पुरुषांनी अत्यंत भावूक होत आधार चॅरिटेबल ट्रस्टचे मनःपूर्वक आभार मानले. "संकटकाळात आणि गरजेच्या वेळी संस्थेने दिलेली ही मदत आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे," अशा भावना यावेळी लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या.