LIVE UPDATES

देवगडात ‘देऊळ बंद २’ ला हाऊसफुल प्रतिसाद

नंदकुमार पेडणेकर, कोकणसाद LIVE सह मालवणी अरोमा समूह यांचे मानले विशेष आभार
Edited by: स्वप्नील लोके
Published on: June 07, 2026 20:46 PM
views 53  views

देवगड : स्वप्नील लोके  : स्वामी समर्थ भक्तांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बहुचर्चित ‘देऊळ बंद २’ या मराठी चित्रपटाच्या विशेष मोफत शोला देवगडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, जोगेश्वरी (मुंबई)चे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांच्या पुढाकारातून रविवारी देवगड येथील स्टारलाईट सिनेमागृहात आयोजित करण्यात आलेला हा विशेष शो पूर्णपणे हाऊसफुल ठरला. सुमारे शंभर स्वामीभक्तांनी या चित्रपटाचा लाभ घेत समाजप्रबोधन करणाऱ्या या कलाकृतीचा मनापासून आस्वाद घेतला.

वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोटचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला कोकणसाद LIVE २४x७, कोकणसाद समूह तसेच मालवणी अरोमा मसाले समूह यांचे विशेष सहकार्य लाभले. धार्मिक विचारांचा प्रसार, सामाजिक जाणीवा जागृत करणे आणि स्वामी भक्तांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा विशेष शो आयोजित करण्यात आला होता.

या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनीही विशेष उपस्थिती दर्शविली. चित्रपट समाप्तीनंतर उपस्थित प्रेक्षकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. स्वामी भक्तांसाठी अशा दर्जेदार आणि विचारप्रवर्तक चित्रपटाचे मोफत आयोजन केल्याबद्दल महेश इंगळे, नंदकुमार पेडणेकर, कोकणसाद LIVE व मालवणी अरोमा समूह यांचे विशेष आभार उपस्थितांनी व्यक्त केले.

‘देऊळ बंद २’ हा चित्रपट श्रद्धा, सामाजिक वास्तव, धार्मिक परंपरा आणि समाजातील विविध प्रश्नांवर प्रभावी भाष्य करणारा ठरला आहे. विशेषतः शेतकरी आत्महत्येच्या गंभीर आणि वेदनादायी विषयाला चित्रपटात अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्यात आले असून, शेतकरी आत्महत्येमागील कारणे, आर्थिक विवंचना, मानसिक संघर्ष आणि त्याचे कुटुंबावर होणारे परिणाम यांचे हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले आहे.

चित्रपटातील प्रभावी कथा, वास्तवदर्शी मांडणी आणि सामाजिक संदेशामुळे अनेक प्रेक्षक भावूक झाले. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर विचार करण्यास भाग पाडणारा हा चित्रपट असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी चित्रपटाच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक आणि प्रबोधनात्मक संदेश देण्याचा स्तुत्य प्रयत्न केल्याचेही प्रेक्षकांनी नमूद केले. स्वामी भक्त परिवाराच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे धार्मिक, सामाजिक आणि जनकल्याणकारी उपक्रम राबविणारे नंदकुमार पेडणेकर यांनी पुन्हा एकदा भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणला. या विशेष शोमुळे स्वामी भक्तांना एकत्र येण्याची, उत्कृष्ट चित्रपटाचा आनंद घेण्याची आणि समाजाला दिशा देणाऱ्या कलाकृतीचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.