LIVE UPDATES

मळेवाड परिसरात पहिल्याच पावसात बीएसएनएलची इंटरनेट सेवा कोलमडली

Edited by: विनायाक गांवस
Published on: June 07, 2026 14:12 PM
views 45  views

सावंतवाडी : मळेवाड परिसरात पहिल्याच पावसात बीएसएनएल इंटरनेट सेवा पूर्णपणे कोलमडली असून यामुळे ग्राहक आणि व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली असताना पहिल्याच जोरदार पावसाने मळेवाड परिसरातील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बीएसएनएल चे ग्राहक ,व्यापारी नेटवर्क नसल्यामुळे हैराण झाले आहे. पहिल्याच पावसानंतर मळेवाड परिसरातील बीएसएनएलचे नेटवर्क पूर्णपणे गायब झाले आहे.

यामुळे  इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे बँक व्यवहार, ऑनलाईन पेमेंट, आणि डिजिटल सेवा पूर्णपणे कोलमडल्या आहेत.व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून दुकानदारांचे ऑनलाईन व्यवहार  बंद पडल्याने स्थानिक बाजारपेठेतील व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे.आयटी क्षेत्रात घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे इंटरनेट नसल्याने प्रचंड नुकसान होत आहे . मळेवाड परिसरात दरवर्षी पावसाळा सुरू झाला की बीएसएनएलची सेवा विस्कळीत होणे ही नित्याचीच बाब बनली आहे. पावसाळ्यापूर्वी योग्य मान्सूनपूर्व कामे  न केल्यामुळेच पहिल्याच पावसात ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.सतत खंडित होणाऱ्या या सेवेमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी आता बीएसएनएल सोडून इतर खाजगी कंपन्यांच्या सिम कार्डचा पर्याय निवडणार असल्याचे सांगितले.

त्यामुळे या समस्येची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास येथील ग्राहक आक्रमक होत दुसरा अन्य पर्याय निवडणार असल्याचे सांगितले. त्यामुळे  बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन मळेवाड परिसरातील इंटरनेट मोबाईल सेवा तात्काळ पूर्ववत करावी, अशी जोरदार मागणी मळेवाड आणि परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.