
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांची डोकेदुखी ठरलेला ‘ओंकार’ हत्ती पुन्हा एकदा तालुक्याच्या हद्दीत दाखल झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही काळापासून हा हत्ती सावंतवाडी तालुक्यातील बांदा, वाफोली आणि परिसरात वावरत होता. त्या काळात त्याने अनेक फळबागांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आता वनविभागानेच या हत्तीला दोडामार्गच्या दिशेने वळविल्याचा आरोप तळकट गावचे सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले यांनी केला आहे.
वन्य हत्तींच्या वाढत्या वावरामुळे दोडामार्ग तालुका गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त आहे. शेतपिकांचे नुकसान, फळबागांची नासधूस आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना ओंकारच्या पुनरागमनाने चिंता अधिक वाढली आहे. विशेष म्हणजे, सावंतवाडी भागात हत्तीचा वावर सुरू झाल्यानंतर त्याला तेथून हटविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याचा परिणाम पुन्हा दोडामार्गवासीयांनाच भोगावा लागत असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.
याबाबत बोलताना सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले यांनी वनविभागाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. इतर तालुक्यांमध्ये हत्तींचा त्रास सहन केला जात नाही आणि त्यांना तत्काळ हटविण्याची यंत्रणा सक्रिय होते. मग दोडामार्गकरांनीच कायम या संकटाचा भार का उचलायचा? आमच्या शेतकऱ्यांचे नुकसान, ग्रामस्थांच्या जीविताला निर्माण होणारा धोका आणि मानसिक तणाव याची दखल कोण घेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांच्या मते, हत्तींच्या प्रश्नावर तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी दीर्घकालीन आणि प्रभावी धोरण आखण्याची गरज आहे. एका भागातील समस्या दुसऱ्या भागात ढकलल्याने प्रश्न सुटत नाही, उलट स्थानिकांचा रोष वाढतो. वनविभागाने हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवून ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामस्थांमध्ये वाढली अस्वस्थता
दरम्यान, ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्ग परिसरात सक्रिय झाल्याच्या चर्चेमुळे अनेक गावांतील ग्रामस्थ व शेतकरी सतर्क झाले आहेत. रात्रीच्या वेळी शेतमळ्यांमध्ये जाणे टाळले जात असून, शेतकरी आपल्या बागायती आणि पिकांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. यापूर्वी झालेल्या नुकसानीच्या आठवणी ताज्या असतानाच नव्या संकटाची चाहूल लागल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
चौकट
सुटका नेमकी कधी होणार?
दोडामार्गमधील हत्तींचा प्रश्न हा केवळ वन्यजीव व्यवस्थापनाचा विषय राहिलेला नसून तो आता स्थानिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित गंभीर समस्या बनला आहे. त्यामुळे प्रशासन आणि वनविभागाने तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. हत्तींच्या दहशतीतून दोडामार्गकरांची सुटका नेमकी कधी होणार? हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच असल्याचे मत सुरेंद्र सावंत-भोसले यांनी व्यक्त केले आहे.











