
दोडामार्ग : किटकनाशक प्राशन करून एका युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. सुनील गोविंद गवस (वय ४३, रा. मेढे) असे मृत युवकाचे नाव असून आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांच्या निधनाने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास सुनील गवस यांनी किटकनाशक प्राशन केले. त्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना गोवा येथील आजिलो रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना पुढे गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा व भाऊ असा परिवार आहे.










