LIVE UPDATES

तुळस जैतीर उत्सवापूर्वी सुसज्ज स्वच्छतागृहासाठी निधी देण्याबाबत कार्यवाहीचे पालकमंत्री राणेंचे निर्देश

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 27, 2026 14:15 PM
views 217  views

वेंगुर्ला : तुळस येथील श्री देव जैतीर देवस्थान येथे दरवर्षी होणाऱ्या जैतीर उत्सवाला महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटक राज्यातून लाखो भाविक येतात. तब्बल ११ दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान भाविक तसेच परिसरातील दुकानदार व टपरीधारकांची मोठी वर्दळ असते. मात्र, स्वच्छतागृह व स्नानगृहाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.

या पार्श्वभूमीवर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या वतीने सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यासाठी २५ ते ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे श्री देव जैतीर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती तुळसचे अध्यक्ष अनिल परब, खजिनदार यशवंत परब यांनी केली आहे. 

पालकमंत्री नितेश राणे होडावडा येथे आले असता त्यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी तुळस गावचे सुपुत्र पंचायत समिती सभापती शंकर घारे, माजी उपसरपंच जयवंत तुळसकर, पोलीस पाटील सागर सावंत आदी उपस्थित होते.  निवेदनात म्हटले आहे की, श्री देव जैतीर उत्सव दरवर्षी वैशाख शुक्ल अमावस्येला मोठ्या उत्साहात साजरा होतो.

या उत्सवासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून लाखो भाविक तुळस येथे दाखल होतात. उत्सव तब्बल ११ दिवस सुरू राहत असल्याने अनेक भाविक देवदर्शनासाठी परिसरात वास्तव्यास राहतात. त्याचबरोबर सुमारे २० ते २५ दुकानदार व टपरीधारकही या काळात येथे वास्तव्यास असतात. त्यामुळे स्नानगृह व स्वच्छतागृहांच्या अपुऱ्या सुविधेमुळे भाविकांसह व्यावसायिकांची मोठी गैरसोय होते.

दरम्यान, या मागणीची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी जैतीर उत्सवापूर्वी स्वच्छतागृहाच्या कामासाठी निधी उपलब्ध होण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आगामी जैतीर उत्सवापूर्वी भाविकांसाठी सुसज्ज स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.