LIVE UPDATES

Ratnagiri Coastal Cleanup Drive : ८८० स्वयंसेवकांनी संकलित केला १५ टनांहून अधिक कचरा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 28, 2026 14:54 PM
views 63  views
Volunteers participating in a coastal cleanup drive at a Ratnagiri beach

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिवसानिमित्त सागरी सीमा मंच, दक्षिण रत्नागिरीच्या पुढाकाराने रत्नागिरी व राजापूर तालुक्यांतील १३ समुद्रकिनाऱ्यांवर किनारपट्टी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एकूण ८८० स्वयंसेवक सहभागी झाले. त्यांनी सुमारे २५६ पिशव्यांमध्ये अंदाजे १५ टनांहून अधिक कचरा संकलित केला असून त्याचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

सागरी सीमा मंचाने जयगड ते आंबोळगड या किनारपट्टीवरील रत्नागिरी व राजापूर तालुक्यांतील समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता अभियान राबविण्याचे नियोजन केले होते. रत्नागिरी शहरातील मांडवी व पांढरा समुद्र यांसह नांदिवडे, संदखोल, वरवडे, मालगुंड, गणपतीपुळे, काळबादेवी, मिऱ्या-शिवलकरवाडी, मिऱ्या-पाटीलवाडी, वेत्ये, कशेळी आणि नाटे या समुद्रकिनाऱ्यांवर अभियान राबविण्यात आले.

या अभियानात विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय विभाग, उद्योग, व्यापारी, मच्छिमार संस्था, स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला. अनंत चतुर्दशीला गणरायांचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विविध किनाऱ्यावर निर्माल्याच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या तसेच अन्य कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला. स्वच्छता अभियानादरम्यान हा कचरा संकलित करून किनारा स्वच्छ करण्यात आला. मांडवी व पांढरा समुद्र येथे कचरा संकलित करण्यात आला असून पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तो वाहनाद्वारे वाहून नेला.