
दोडामार्ग : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच वनक्षेत्रातील पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने दोडामार्ग वनविभागाच्या वतीने तेरवण मेढे वनक्षेत्रात वनराई बंधारा बांधण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक श्रमदान करून हा जलसंधारणाचा उपक्रम राबविला.
वनक्षेत्रात पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे तसेच आगामी काळात वन्यजीव व वनस्पतींना पाण्याची उपलब्धता कायम ठेवणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविल्याने परिसरातील जलसाठा वाढण्यास मदत होणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक असून, वनक्षेत्रात अशा प्रकारचे बंधारे उभारल्याने पाणी साठवणुकीला मोठी मदत होते, अशी भावना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमात वनक्षेत्रपाल संभाजी पाटील, कोनाळ वनपाल चंद्रकांत पावसकर, वनरक्षक अनिल राख, सुशांत कांबळे यांच्यासह सहाय्यक वन कर्मचारी सहभागी झाले होते. वनविभागाने राबविलेल्या या उपक्रमामुळे जलसंधारणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाच्या कार्यालाही चालना मिळणार आहे.












