LIVE UPDATES

आंजणारी घाटातील तीव्र उतारात पुन्हा एकदा अपघात

कोळसा वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक गंभीर जखमी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 02, 2026 17:06 PM
views 34  views

राजापूर : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील आंजणारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. गोव्याच्या दिशेने कोळशाची वाहतूक करणारा ट्रक तीव्र उतारात अनियंत्रित होऊन पलटी झाला. या अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०९ एफएल ५१५३ क्रमांकाचा हा ट्रक कोळसा घेऊन गोव्याच्या दिशेने जात होता. शुक्रवारी सकाळी सुमारे ११.२५ वाजण्याच्या सुमारास आंजणारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक रस्त्यावर पलटी झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तसेच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या चालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.

आंजणारी घाटातील तीव्र उतार, वळणे आणि अवजड वाहनांची वाढती वाहतूक यामुळे या मार्गावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक आणि स्थानिकांकडून होत आहे. या अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू असून, अपघाताचे नेमके कारण तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.