
दोडामार्ग : दोडामार्ग तिलारी-विजघर राज्यमार्गाच्या दुरावस्थेने नागरिकांचा संयम अखेर सुटला. अर्धवट आणि निकृष्ट कामाविरोधात संतप्त प्रवीण गवस, राजेंद्र म्हापसेकर व नागरिकांनी गुरुवारी पाळये येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, सोमवारपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास मंगळवारपासून अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
तिलारी ते विजघर या महत्त्वाच्या मार्गाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत सोडण्यात आले आहे. कुठे रस्ता खोदून ठेवलेला, तर कुठे निकृष्ट कामामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावर आवश्यक दिशादर्शक आणि धोक्याचे सूचना फलकही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक लहान-मोठे अपघात घडूनही संबंधित विभागाला जाग येत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले. पावसाळ्यापूर्वी ठिकठिकाणी खणून ठेवलेल्या राज्यमार्गाचे काम पावसाळ्यानंतरही सुरू न झाल्याने स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी काम सुरू न झाल्यास गुरुवारपासून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला होता. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने गुरुवारी सकाळी १० वा. या मार्गावरील पाळये तिठा येथे रास्ता रोको आंदोलनास सुरुवात केली. जि.प. माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, ठाकरे युवासेना तालुका प्रमुख मदन राणे, संदेश वरक व स्थानिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
प्रवाशांचाही आंदोलनात सहभाग...
आंदोलनाची तीव्रता इतकी होती की तब्बल दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे दीड दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. स्थानिक ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत या आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवाय मार्गस्थ होणाऱ्या प्रवाशांनीही रस्त्याची भीषण अवस्था पाहून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यात युवक, महिला व ज्येष्ठांचा सहभाग लक्षणीय ठरला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हा रस्ता आमचा आहे. याच रस्त्यावरून आम्ही दररोज प्रवास करतो. मग आम्ही आणखी किती दिवस हा त्रास सहन करायचा? असा सवाल करत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.
आंदोलनातही माणुसकीचा झरा!...
रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प असतानाच एका खासगी वाहनातून रुग्ण प्रवास करत असल्याचे आंदोलकांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आंदोलकांनी तत्काळ रुग्णवाहतुकीसाठी नव्हे, तर त्या रुग्णाच्या वाहनासाठी वाट मोकळी करून दिली. हक्कासाठी रस्त्यावर उतरलेले आंदोलक एका रुग्णाच्या मदतीसाठी तत्पर झाल्याने त्यांच्या या माणुसकीचेही विशेष कौतुक झाले.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित; ठेकेदाराला सोमवारची मुदत!
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी मध्यस्थी केली. संबंधित ठेकेदाराला तातडीने काम सुरू करण्याबाबत लेखी पत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार ठेकेदाराने सोमवारपासून काम सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच प्रशासनाकडून १६ तारखेपासून प्रत्यक्ष काम सुरू करण्याची ग्वाही देण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तूर्तास आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा आंदोलनाचा शेवट नसून प्रशासनाला दिलेली शेवटची संधी असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
सोमवार सायंकाळपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही, तर कोणतीही पूर्वसूचना न देता मंगळवारपासून यापेक्षाही तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा देण्यात आला. यापुढील आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदाराची राहील, असेही आंदोलकांनी ठणकावून सांगितले. तसेच रस्त्याचे जे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, ते केवळ वरवर दुरुस्त न करता संबंधित खराब काम काढून आवश्यक निकषांनुसार दर्जेदार पद्धतीने पुन्हा करण्यात यावे, अशी आग्रही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








