
वैभववाडी : तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेतील अडचणी दूर करण्यासाठी पंचायत समिती सभापती सिद्धेश दिलीप रावराणे यांनी पुढाकार घेतला आहे. वैभववाडी ग्रामीण रुग्णालय आणि उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात टी.टी. इंजेक्शनची कमतरता असल्याचे निदर्शनास येताच सभापती रावराणे यांनी तातडीने पुढाकार घेत ८०० टी.टी. इंजेक्शन आरोग्य विभागाकडे सुपूर्द केली. आरोग्यसेवेत आवश्यक औषधे आणि इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यास त्याचा फटका थेट सर्वसामान्य रुग्णांना बसतो. ही बाब लक्षात घेऊन श्री रावराणे यांनी कोणताही विलंब न करता इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याने दोन्ही रुग्णालयांतील आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी आवश्यक सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आरोग्य विभागाला आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमामुळे वैभववाडी आणि उंबर्डे रुग्णालयातील टी.टी. इंजेक्शनचा तातडीचा प्रश्न मार्गी लागला आहे.स्वातंत्र्य दिनी दोन्ही रुग्णालयात जाऊन ही इंजेक्शन त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या स्वाधीन केली. यावेळी उपसभापती साची कोलते, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, स्वप्निल धुरी, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, साधना नकाशे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










