LIVE UPDATES

मालवण शहरातील समस्यांबाबाबत नगरसेवक तपस्वी मयेकर यांचं उपोषण

वैभव नाईक यांचा सहभाग | लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 16:35 PM
views 18  views

मालवण : मालवण शहरातील विविध समस्यांबाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी स्वातंत्र्यदिनी मालवण नगरपालिके समोर उपोषण छेडले होते. या उपोषणास माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन ते उपोषणात सहभागी झाले. यावेळी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात हे उपोषण स्थळी आले असता वैभव नाईक यांनी उपोषणकर्त्यांसमवेत  मुख्याधिकाऱ्यांशी मालवण शहरातील विविध समस्यांवर सखोल चर्चा केली. या चर्चेनंतर उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन मुख्याधिकारी थोरात यांनी दिल्याने तपस्वी मयेकर यांनी उपोषण स्थगित केले.

यावेळी शिवसेना नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, नगरसेवक मंदार ओरसकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, माजी नगरसेविका तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपूटे, मनसेचे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसीएशन, काँग्रेसचे बाळू अंधारी, संदेश कोयंडे, आप्पा चव्हाण, राधिका मोंडकर, निनाक्षी शिंदे, रूपा कुडाळकर, आर्या गावकर, गौरी मयेकर, जयमाला मयेकर, उमेश मांजरेकर, पॉली गिरकर, योगेंद्र गावकर, हेमंत मोंडकर, उमेश चव्हाण, विनायक कोळंबकर, किरण  चव्हाण, बंड्या सरमळकर , सिद्धेश मांजरेकर, निलेश दुधवडकर, कमलाकर खोत आदी उपस्थित होते.

यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी उपोषणस्थळी भेट देऊन तपस्वी मयेकर व इतरांशी चर्चा केली. यावेळी तपस्वी मयेकर यांनी मालवण शहरासाठी मंजूर नळपाणी योजनेचे काम निविदेतील अटी व शर्तीनुसार होत नाही. या योजनेवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेचे सर्व्हेसर्वा हे ठेकेदाराचे जवळचे नातेवाईक असल्याने योजनेवर योग्य नियंत्रण ठेवले जात नाही व कामाचा दर्जा तपासला जात नाही, असा आरोप केला. यासंदर्भात प्रशासनाने कोणतीही चौकशी किंवा कारवाई केलेली नाही, असे सांगितले. तसेच भुयारी गटार योजना गेली २० वर्षे अपूर्णच आहे. ही योजना अपूर्ण का राहिली? कामाची मुदत किती होती? या योजनेसाठी शासनाकडून किती निधी प्राप्त झाला व किती खर्च झाला? याची कोणतीही माहिती स्पष्ट नाही. पाठपुरावा करूनही ठेकेदारावर कारवाई न झाल्याने ठेकेदाराला सोबत घेऊन प्रशासनाने आढावा बैठक घ्यावी व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी तपस्वी मयेकर यांनी केली. 

त्याचप्रमाणे मालवणच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या देऊळवाडा ते भरड या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर अनधिकृत बांधकामामुळे व दुकानांमुळे सतत वाहतूक कोंडी होते. याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रस्त्याकड़ेची अनधिकृत बांधकामे व स्टॉल हटविले जावेत, अशी मागणी केली.  शहरातील घरोघरी कचरा उचलण्यासाठी पूर्वी काही लाखांत होणारा ठेका आता २ कोटी रुपयांचा काढण्यात आला आहे. तरीही गेल्या १० वर्षांप्रमाणेच कचरा संकलन सुरू आहे. कंत्राटदार निविदेतील अटी व शर्तीनुसार काम करत नाही, तरीही ठेकेदाराला बिल दिले जात आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करूनही योग्य काम न करणाऱ्या ठेकेदारावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. ठेकेदार आणि सत्ताधारी यांचे संगनमत आहे, असा आरोप यावेळी मंदार ओरसकर यांनी केला.

उपोषण कर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी संबंधित समस्या व प्रलंबित कामांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. नळपाणी योजना तसेच भुयारी गटार योजनेच्या कामाबाबत आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नगराध्यक्षांना विनंती करून सविस्तर चर्चा व आढावा घेण्यासाठी एका महिन्याच्या आत बैठका आयोजित करू, भुयारी गटार, शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारीत असलेल्या देऊळवाडा ते भरड रस्त्यालगतची अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी बांधकाम विभागाला सूचना दिली असून गणेश चतुर्थीपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभाग यांच्या सहकार्याने सदर अतिक्रमणे हटविण्यात येतील, घरोघरी कचरा उचलणे कामाबाबत आलेल्या तक्रारीनुसार ठेकेदारावर योग्य ती कायदेशीर दांडात्मक कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासनाचे पत्र मुख्याधिकारी श्री. थोरात यांनी तपस्वी मयेकर यांना सादर केले. या आश्वासनावर मयेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपोषणास स्थगित केले. मात्र आश्वासनानुसार कार्यवाही न झाल्यास प्रखर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तपस्वी मयेकर यांनी दिला.