LIVE UPDATES

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा शुभारंभ

दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यावरणपूरक उद्योगांवर भर देणार : पालकमंत्री नितेश राणे
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 16:44 PM
views 25  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक लोकांच्या गरजा लक्षात घेऊन पर्यावरणपूरक प्रकल्प राबवल्यास ‘गाव तिथे उद्योजक’ ही संकल्पना अत्यंत यशस्वी होऊ शकते. या अभियानाला यश मिळवून देण्यासाठी पालकमंत्री म्हणून माझे कायम पूर्ण सहकार्य राहील, असे ठाम प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. झाराप येथील हॉटेल आराध्या येथे आयोजित ‘गाव तिथे उद्योजक’ या राज्यातील पहिल्या अभियानाच्या शानदार उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कोकणातील तरुणांच्या स्वप्नांना आणि पंखांना बळ देत नवीन पिढीचे उद्योजक घडवण्यासाठी झाराप येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दोन वर्षांत दरडोई उत्पन्न ५ लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट

या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, "जिल्ह्याच्या विकासात ‘गाव तिथे उद्योजक’ अभियान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. खासदार नारायण राणे यांनी नेहमीच दरडोई उत्पन्न वाढवण्यावर भर दिला आहे. तोच दूरदृष्टिकोन ठेवून पुढील दोन वर्षांत सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न साडेचार ते पाच लाखांपर्यंत नेण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. जिल्ह्यातील दारिद्र्य आणि कुपोषण संपवण्यासाठी रोजगार निर्मिती हीच आपली मुख्य दिशा आहे. दहावी-बारावीच्या सत्कारानंतर तरुण नोकरीच्या शोधात बाहेर पडतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी ग्रामीण भागात पर्यावरणपूरक व्यवसायांची सांगड घालणे गरजेचे आहे."

MACCIA चे ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर म्हणाले की, या अभियानाद्वारे सिंधुदुर्गातील तरुणांना उद्योजक बनवण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून चेंबर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी सांगितले की, अवघ्या ४० दिवसांत ही संकल्पना जिल्ह्यात प्रत्यक्षात उतरवण्यात आली आहे. नोकरीसाठी गावातील माणसे शहराकडे स्थलांतरित होण्याचे चक्र थांबवण्यासाठीच गावात उद्योजकीय मानसिकता तयार केली जात आहे.

या प्रसंगी आमदार प्रमोद जठार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष राणे यांनी, सूत्रसंचलन प्रफुल्ल वालावलकर यांनी तर आभारप्रदर्शन ॲड. नकुल पार्सेकर यांनी केले.

या सोहळ्याला आमदार निलेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, व्यापारी महासंघ जिल्हा अध्यक्ष संजय सावंत, MIDC असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, MACCIA चे उपाध्यक्ष संतोष राणे, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य राजन नाईक, मनोज वालावलकर, विजय केनवडेकर, कुणाल वरसकर, विशाल कामत, मिलिंद प्रभु, करुणाकर शेट्टी, सुनीता फाल्गुनी, बी. एस. राघवेंद्र, डॉ. दीपक परब, आनंद बांदिवडेकर, शशी चव्हाण, संजीव प्रभु, सीए सुनील सौदागर, अमित वळंजू, अभय वालावलकर यांच्यासह कोकण व महाराष्ट्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.