LIVE UPDATES

वीणेवर साकारलं विठ्ठल-रुक्मिणींचं देखणे चित्र

चित्रकार श्रुती सुतार यांची अनोखी कलाकृती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 24, 2026 19:47 PM
views 24  views

वैभववाडी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त तालुक्यातील गडमठ  येथील युवा चित्रकार श्रुती संतोष सुतार यांनी कॅनव्हासऐवजी वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या वीणेवर भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचे आकर्षक चित्र साकारून भक्ती आणि कलेचा अनोखा संगम घडविला आहे. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो.

या उत्सवानिमित्त श्रुती सुतार यांनी वारकरी परंपरेचे प्रतीक असलेल्या वीणेवर ऍक्रेलिक रंगांच्या माध्यमातून विठ्ठल-रुक्मिणींची मनोहारी प्रतिमा रेखाटली आहे. वारकरी गळ्यात वीणा धारण करून 'राम कृष्ण हरी'चा अखंड नामजप करतात. त्यामुळे वीणा ही केवळ एक वाद्य नसून भक्ती, नामस्मरण आणि अध्यात्माचे प्रतीक असल्याची भावना या कलाकृतीतून प्रभावीपणे व्यक्त करण्यात आली आहे.या चित्रामध्ये भगवान विठ्ठलांची प्रतिमा सुमारे ६.५ इंच, तर माता रुक्मिणींची प्रतिमा ५.५ इंच उंचीची असून संपूर्ण कलाकृती ऍक्रेलिक रंगांच्या माध्यमातून अत्यंत बारकाईने साकारण्यात आली आहे. या कलाकृतीद्वारे सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत भक्तीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न चित्रकार श्रुती  यांनी केला आहे.

श्रुती यांनी यापूर्वीही विविध माध्यमांवर सूक्ष्म चित्रकला साकारली होती. त्यांनी रुईच्या पानावर हनुमान, गंधगोळीवर विठ्ठल, तुळशीच्या पानावर श्रीकृष्ण, मोरपिसावर श्रीकृष्ण, सूक्ष्म टिकलीवर नऊ दुर्गांची चित्रे तसेच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे सूक्ष्म चित्र साकारून आपल्या कलाकौशल्याची छाप पाडली आहे. त्यांच्या विविध कलाकृतींमधून सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांना स्पर्श करणारा आशयही प्रकर्षाने दिसून येतो. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वीणेवर साकारलेल्या विठ्ठल-रुक्मिणींच्या या अनोख्या कलाकृतीचे परिसरातून कौतुक होत आहे.