
सिंधुदुर्ग : पालकमंत्री नितेश राणे यांच्या अवैध धंद्याविरोधातील बेधडक भुमिकेनंतर दोन नंबर धंदेवाल्यांनी सिंधुदुर्ग अन् रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर आपल बस्तान मांडल आहे. जिल्ह्यांच्या सीमेवर राजापूर तालुक्यातील एका हॉटेलमध्ये त्यांनी 'अंदर-बाहर' जुगाराचा अड्डा सुरू केला असून रात्रीच्या अंधारात चालणारा हा जुगाराचा बाजार कुणाच्या आशीर्वादाने ? असा सवाल उपस्थित होत आहे.
राजापूर तालुक्यातील एका गावात हायवे लगत असणाऱ्या हॉटेलमध्ये हा जुगार चालतो. रात्री 12 ते सकाळी 7 पर्यंत लाखोंची उलाढाल इथे होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच खाकीला देखील इथे मोठा वाटा मिळतं असल्याची चर्चा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंदेवाईकांचा समावेश यात असून खाकीचा धाक तिथे राहिलेला नाही. त्यामुळे जुगाराची बसणारी ही खुलेआम बैठक कोणाच्या आशीर्वादाने ? असाही सवाल आता उपस्थित होत आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अवैध धंद्याविरोधातील कडक भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाईकांनी सीमेवर आपल बस्तान बसवले आहे. त्यामुळे सीमेवरच्या या 'खेळ्यां'वर खाकीकडून कोणती कारवाई होते ? याकडेही आता लक्ष लागून राहिले आहे.










