LIVE UPDATES

उभ्‍या कंटेनरला बसलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कंटेनरचालकावर गुन्‍हा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 05, 2026 19:33 PM
views 55  views

कणकवली : साळीस्‍तेहून तळेरेला जात असलेल्‍या दुचाकीस्‍वाराची महामार्गानजीक उभ्‍या असलेल्‍या कंटेनरला धडक बसली. साळीस्‍ते येथेच मंगळवारी दुपारी १२.३० वा. सुमारास झालेल्‍या या अपघातात दुचाकीस्‍वार विशाल विजय लिंगायत (२२, साळीस्‍ते - रामेश्‍‍वरवाडी) हा मयत झाला.

विशाल हा तळेरे – वाघाचीवाडी येथील एका पेट्रोलपंपावर कामाला होता. दुपारच्‍या सुमारास तो दुचाकी घेऊन कामावर जात होता. त्‍यावेळी साळीस्‍ते येथील स्‍मशानभूमीकडे महामार्गाच्‍या बाजूला एक कंटेनर निष्‍काळजीपणे उभा करण्‍यात आला होता. विशालच्‍या ताब्यातील दुचाकीची कंटेनरला पाठीमागून धडक बसली. अपघातात गंभीर जखमी झालेल्‍या विशालला उपचारासाठी कणकवली उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. मात्र, तेथील डॉक्‍टरांनी तपासणी केली असता विशालचा मृत्‍यू झाला होता.

अपघाताची फिर्याद विशालचे चुलते मयुरेश कृष्‍णा लिंगायत (३६, साळीस्‍ते - रामेश्‍‍वरवाडी) यांनी दिली. कंटेनरचालक पुरूषोत्तम नंदलाल उपाधय (६५, रा. चंपाबाग – मध्‍यप्रदेश) याने कंटेनर निष्‍काळजीपणे रस्त्यावर उभा केला होता, असे फिर्यादीत म्‍हटले आले. त्‍यानुसार पुरूषोत्तम याच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.