
कुडाळ : संसाराचा रथ ओढताना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र साथ देणाऱ्या पत्नीप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी, तसेच जन्मोजन्मी हीच पत्नी लाभावी या श्रद्धाभावाने कुडाळ गवळदेव येथे 'पुरुषांची वटपौर्णिमा' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उमेश गाळवणकर मित्र मंडळ व डॉ. संजय निगुडकर यांच्या मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या व्रताचे हे सलग १८ वे वर्ष आहे.
सध्याच्या काळात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारा आणि कौटुंबिक मूल्यांची जपणूक करणारा हा उपक्रम सिंधुदुर्गात कौतुकाचा विषय ठरला आहे.
गवळदेव येथे सकाळी ब्राह्मणांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त आणि विधिवत पूजेला सुरुवात झाली. उपस्थित सर्व पतींनी शुचिर्भूत होऊन वडाच्या झाडाची पूजा केली. यानंतर पारंपरिक पद्धतीने वडाला सुताचे वेढे घालत सात फेऱ्या मारल्या आणि पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी व सात जन्मी हीच सहचारिणी मिळण्यासाठी प्रार्थना केली.
या आगळ्यावेगळ्या वटपौर्णिमा सोहळ्यात परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर आवर्जून सहभागी झाले होते. यामध्ये बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै महिला महाविद्यालय व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बी. एड. कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, प्रा. नितीन बांबर्डेकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार राजू कलिंगण, उमेश दाभोलकर, डॉ. प्रणव व चैताली प्रभू, प्रसाद कानडे, महादेव परब, ओंकार कदम, संतोष पडते, सुनील गोसावी, ज्ञानेश्वर तेली यांच्यासह अनेक ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
"स्त्री नेहमीच संसाराचा आधार असते. ती केवळ पत्नी नसून एक उत्तम सल्लागार, मैत्रीण, सेवेकरी आणि पुरुषाची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी अहोरात्र झटणारी शक्ती असते. स्वतः कष्ट करूनही पतीला देवाप्रमाणे मानणाऱ्या पत्नीचा आदर करणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य आहे. हाच आदर आणि सन्मानाचा संदेश या व्रतातून समाजाला देण्यात आला आहे," अशी भावना याप्रसंगी आयोजकांनी व उपस्थित पुरुषांनी व्यक्त केली. अत्यंत उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली होती.










