LIVE UPDATES

मोंड इथं वृक्षारोपण उत्साहात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 05, 2026 20:27 PM
views 63  views

देवगड : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत मोंड व प्राथमिक आरोग्य केंद्र मोंड येथे पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन सभापती गणेश राणे यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायत परिसर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांना स्वच्छ व निरोगी पर्यावरण मिळावे यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या उपक्रमात ग्रामपंचायत प्रशासक मोंड शामल संदीप अनभवणे, प्रशासकीय समिती सदस्य अभय जयंत बापट, प्रसाद प्रकाश कुलकर्णी, वैशाली अशोक अनभवणे, प्रदीप तुकाराम कोयंडे, ग्रामपंचायत अधिकारी राधिका आचरेकर, वैदयकिय अधिकारी डॉ. सोनाली तेली, आरोग्य निरीक्षक सयाजी जाधव आणि ग्रामस्थ भाई साटम, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच विविध मान्यवरांनी सहभाग घेतला. उपस्थितांनी वृक्षारोपणासह पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली.