
सिंधुदुर्गनगरी : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अवघ्या २० दिवसांच्या विक्रमी कालावधीत घरगणनेचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनबद्ध कामकाजामुळे हा मान जिल्ह्याला मिळाला आहे.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहीम १६ मे २०२६ पासून सुरू करण्यात आली होती. या मोहिमेत जिल्ह्यातील ०८ तहसील कार्यालये, ०३ नगरपरिषदा आणि ०५ नगरपंचायती अशा एकूण १६ कार्यालयांचा सहभाग होता. जिल्ह्यातील २६० पर्यवेक्षक आणि १,४६० प्रगणकांनी अथक परिश्रम घेत १,४५१ घरयादी गटांची गणना यशस्वीरित्या पूर्ण केली.
या यशामागे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे सूक्ष्म नियोजन, सातत्यपूर्ण आढावा बैठका, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेले मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींतून समस्यांचे तत्काळ निराकरण यांचा मोठा वाटा राहिला. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनीही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे मोहिमेला गती मिळाली. तसेच प्रभारी अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडणाऱ्या तहसिलदार आणि मुख्याधिकारी यांनीही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले की, घरगणनेचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आता गुणात्मक पाहणी आणि अनियमितता दुरुस्तीची प्रक्रिया देखील मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
जनगणना प्रक्रियेतील स्वगणना टप्पा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात आला होता. या टप्प्यात जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत डिजिटल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. एकूण २९ हजार ५९१ घरांची स्वगणना पूर्ण झाली असून १७ गावे आणि एका नगरपंचायतीने शंभर टक्के स्वगणनेचे उद्दिष्ट गाठले. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील 'मूठ' हे गाव सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले महसुली गाव ठरले. या यशामुळे जिल्ह्यातील नागरिकांची नागरी जबाबदारीची जाणीव आणि डिजिटल साक्षरता अधोरेखित झाली आहे.
जनगणना मोहिमेच्या यशात जिल्ह्यातील सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे योगदान मोलाचे ठरले. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, समन्वय, समर्पण आणि टीमवर्कमुळेच ही ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व प्रगणक, पर्यवेक्षक आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याने जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात नोंदविलेली ही राज्यातील अग्रक्रमाची कामगिरी प्रशासनाची कार्यक्षमता, नियोजनबद्धता आणि जनसहभागाचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असून, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही ती प्रेरणादायी ठरणार आहे.











