LIVE UPDATES

तिलारी-विजघर रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात गुरूवारी रास्ता रोको आंदोलन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 11, 2026 03:35 PM
views 12  views
Incomplete road construction work on the Tilari to Vijghar road in Dodamarg, Sindhudurg.

दोडामार्ग : तिलारी ते विजघर या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक अपघातांच्या घटनाही घडल्या आहेत. वारंवार सूचना देऊनही संबंधित विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा स्वराज्य सरपंच सेवा संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रविण नारायण गवस यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी दोडामार्ग पोलिस निरीक्षक यांना दिले आहे.

तिलारी ते विजघर रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवण्यात आले असून, आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक अथवा सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी तसेच वाहतूक करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या परिस्थितीमुळे अपघातांचाही धोका वाढला असून, काही अपघात घडल्याचे प्रविण गवस यांनी निवेदनात नमूद केले आहे. याबाबत संबंधित विभागाला वेळोवेळी सूचना देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. दरम्यान, आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असा इशाराही प्रविण गवस यांनी दिला आहे.