LIVE UPDATES

Chiplun News : चिपळूणात ‘स्वर दिवाळी पहाट’ची सुरेल मैफिल

अमोल बावडेकर, ईशानी पाटणकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध ; आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 11, 2026 11:27 AM
views 31  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आणि मँगो इव्हेंट्स प्रस्तुत चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर दिवाळी पहाट’ या सुरेल संगीत मैफिलीला चिपळूणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अभंग, भक्तिगीते आणि लोकप्रिय मराठी-हिंदी गीतांच्या सुरेल सादरीकरणातून प्रसिद्ध अभिनेते व गायक अमोल बावडेकर आणि रत्नागिरीची सुकन्या, प्रसिद्ध गायिका ईशानी पाटणकर यांनी उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार सदानंद चव्हाण आणि आमदार प्रमोद जठार यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान कलाकारांनी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि महायुती सरकारचे विशेष आभार मानले. महायुती सरकारच्या काळात सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून कलाकारांना मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची संधी उपलब्ध होत असून, कलेला राजाश्रय देण्याचे महत्त्वपूर्ण काम सरकारकडून होत आहे. कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार, अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली.

अभंग आणि भक्तिगीतांच्या भक्तिमय वातावरणासोबतच लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणाने संपूर्ण मैफिलीला रंगत आली. अमोल बावडेकर यांच्या दमदार सादरीकरणाला आणि ईशानी पाटणकर यांच्या सुरेल गायनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. संगीत, भक्ती आणि मनोरंजनाचा सुंदर संगम अनुभवत चिपळूणकरांनी या ‘स्वर दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेशजी सकपाळ, भाजप रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, भाजप शहराध्यक्ष आशिष खातू, गटनेते शशिकांत मोदी, स्वानंद रानडे, नगरसेवक रत्नदीप देवळेकर यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने चिपळूणकर रसिक उपस्थित होते.