
कणकवली : नोव्हेंबर महिन्याचा प्रारंभ होताच कणकवली तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवेत अचानक गारवा वाढल्याने थंडीची चाहूल लागली आहे. रात्री उशिरापासून हवेत गारवा निर्माण होत असून पहाटेच्या वेळी चांगलीच थंडी जाणवू लागली आहे. या बदलत्या वातावरणामुळे नागरिक आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
सकाळी 'मॉर्निंग वॉक' आणि रांगोळी काढताना कानटोपी, जॅकेटची साथ
पहाटेच्या थंडीचा आनंद घेत अनेक नागरिक 'मॉर्निंग वॉक'साठी घराबाहेर पडत आहेत, तर दुसरीकडे दिवाळीच्या मंगलमय वातावरणात घरापुढे सडा-रांगोळी काढणाऱ्या महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. कानटोपी, रुमाल, जॅकेट आणि मफलरचा वापर करून नागरिक या गुलाबी थंडीपासून स्वत:चे संरक्षण करताना ठिकठिकाणी दिसून येत आहेत.
आंबा आणि काजू पिकांसाठी थंडी ठरणार फायदेशीर
हवामानातील या बदलामुळे निसर्गातही नयनरम्य बदल घडून येत असून झाडांना नवीन पालवी फुटू लागली आहे. विशेषतः कोकणातील महत्त्वाचे आर्थिक पीक मानल्या जाणाऱ्या आंबा आणि काजू फळझाडांना फुलधारणा (मोहर) होण्यास सुरुवात झाली आहे.येत्या काळात जर अशीच उत्तम व योग्य प्रमाणात थंडी टिकून राहिली, तर यंदा आंबा आणि काजूचे बंपर उत्पादन येईल, अशी आशा जिल्ह्यातील शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








