LIVE UPDATES

देवगडमध्ये तीन कृषी औषधांची उत्पादने बोगस

काका ढोके यांचा खळबळजनक दावा : कृषी व महसूल विभागाच्या कारभारावर संघटनेची नाराजी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 23, 2026 06:33 PM
views 144  views

देवगड : देवगड तालुक्यातील कृषी औषध विक्रेत्यांकडून तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी तीन उत्पादनांचे नमुने बोगस असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाल्याचा खळबळजनक दावा आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघाचे अध्यक्ष काका ढोके यांनी केला आहे. संबंधित उत्पादनांबाबत अहवाल प्राप्त होऊनही दोषी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत त्यांनी कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच बोगस कृषी औषधांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता संबंधित विक्रेत्यांसह तपासणी व कारवाईसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

देवगड येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गणेश गावकर, नीरज घाडी आदी उपस्थित होते.

काका ढोके म्हणाले की, कृषी विभागाने जुलै महिन्यात तालुक्यातील १३ कृषी औषध विक्रेत्यांकडून उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. देवगड तालुक्यात ५९ परवानाधारक कृषी औषध विक्रेते असून, त्यापैकी ५३ विक्रेत्यांची दुकाने सुरू आहेत. तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी तीन उत्पादनांचे नमुने बोगस असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर साधारणतः ३० दिवसांत अहवाल प्राप्त होणे अपेक्षित असते. नमुने तपासणीसाठी घेतल्यानंतर संबंधित औषधांची विक्री करू नये, असे असताना नमुने घेतलेल्या औषधांचीही विक्री झाल्याचा आरोप ढोके यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही संबंधित विक्रेत्यांवर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणाबाबत संघटनेने कृषी विभागाकडे विचारणा केली असता, संबंधित विषय न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आल्याचे ढोके यांनी नमूद केले. कृषी अधिकारी आणि विक्रेते यांच्या संगनमतामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा तसेच बोगस औषधे विकणाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

शेतकऱ्यांनी कृषी औषधे खरेदी करताना संबंधित उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत का, याची खात्री करूनच खरेदी करावी, असे आवाहन ढोके यांनी केले. संबंधित तीन उत्पादनांच्या प्रकरणात लवकरात लवकर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघटना प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संघटनेची आंदोलने कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून ती केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू आहेत, असे सांगताना काही कृषी औषध विक्रेते किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्तींकडून आंदोलनाला धमकाविण्याची भाषा वापरली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना ठामपणे उभी राहील. धमकाविण्याचे प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून उत्तर दिले जाईल, असा इशाराही ढोके यांनी दिला.

शेतकरी नुकसानभरपाईत गैरव्यवहार झाल्याचा आरोप

गणेश गावकर यांनीही कृषी विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप केले. शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या नुकसानभरपाईच्या रकमेतून पैसे मागितल्याचे पुरावे संघटनेकडे असल्याचा दावा त्यांनी केला. तळेबाजार येथील एका शेतकऱ्याकडे संबंधित कृषी सेवकाने पैसे मागितल्याचा पुरावा तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आला असून, संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केल्याचे गावकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीच्या रकमेतही गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याऐवजी त्यांची आर्थिक पिळवणूक होत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह

देवगड तालुक्यातील काही तलाठी आणि मंडल अधिकारी खरेदी-विक्री व्यवहार, वारस तपासणी तसेच शेतकरी दाखले मिळविण्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना वारंवार त्रास देत असल्याचा आरोपही गावकर यांनी केला. काही तलाठी व मंडल अधिकाऱ्यांवर यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यावेळी त्यांचे तात्पुरते निलंबन झाले, मात्र त्यानंतर ते पुन्हा याच तालुक्यात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

बाहेरील जिल्ह्यांतून आलेल्या काही तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचा आरोप करत, मुंबईत राहणाऱ्या ग्रामस्थांच्या तसेच वारसदार नसलेल्या कुटुंबांच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार काही ठिकाणी होत असल्याचा दावाही गावकर यांनी केला. या आरोपांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महसूल विभागाकडे केली.

कृषी आणि महसूल विभागातील कथित गैरप्रकारांबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघाच्या वतीने व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा गणेश गावकर यांनी दिला.


ताजी बातमी

View all

आजगाव मराठी ग्रंथालयात ‘अशोक शिरोडकर स्मृती बालवाचनालया’चे उद्घाटन
October 23, 2026
Class 6 students showcase and sell handmade herbal soaps as part of a practical vocational education project.
Sawantwadi News : तळवडेतील विद्यार्थ्यांनी बनवले १२५ हर्बल साबण
October 23, 2026
संजय ढवळीकर यांच्या ''माहिती हक्क कायदा परिचय आणि विश्लेषण'' पुस्तकाचे प्रकाशन
October 23, 2026
वेतन न मिळाल्यामुळे प्रशिक्षित डॉक्टरांचे वैद्यकीय महाविद्यालयासमोर आंदोलन
October 23, 2026
संबंधित बातम्या

View all

आजगाव मराठी ग्रंथालयात ‘अशोक शिरोडकर स्मृती बालवाचनालया’चे उद्घाटन
October 23, 2026
Class 6 students showcase and sell handmade herbal soaps as part of a practical vocational education project.
Sawantwadi News : तळवडेतील विद्यार्थ्यांनी बनवले १२५ हर्बल साबण
October 23, 2026
संजय ढवळीकर यांच्या ''माहिती हक्क कायदा परिचय आणि विश्लेषण'' पुस्तकाचे प्रकाशन
October 23, 2026
तुळस घाटीत झाड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प
October 23, 2026