
सावंतवाडी : वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून आजगाव मराठी ग्रंथालयात स्वर्गीय अशोक शांताराम शिरोडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेल्या ‘अशोक शांताराम शिरोडकर स्मृती बालवाचनालया’चे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका तथा कवयित्री वृंदा कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. पराग शिरोडकर आणि काव्या शिरोडकर यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजगावच्या सरपंच यशश्री सौदागर होत्या. जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी उपसरपंच सुशील कामटेकर, आजगाव मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष रामचंद्र झांट्ये, केंद्रप्रमुख संजीवनी कोकितकर, आजगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक उत्तम भागीत, विशाल उगवेकर, अनिल निखार्गे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वर्गीय अशोक शांताराम शिरोडकर यांच्या स्मृती जतन करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने बालवाचनालय सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याची संधी मिळून त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होणार आहे
यावेळी वृंदा कांबळी, अपर्णा सातोसकर आणि पराग शिरोडकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. वाचनामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती, विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचनाचीही सवय लावून घ्यावी, असे आवाहन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मठकर गुरुजी यांनी केले, तर ग्रंथालयाचे अध्यक्ष रामचंद्र झांट्ये यांनी आभार मानले. बालवाचनालयाच्या माध्यमातून आजगाव परिसरात वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.








