
पणजी : गोवा राज्याचे माजी माहिती आयुक्त आणि संपादक संचालक फोमेंतो सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) मीडिया, लेखक संजय ढवळीकर यांच्या ''माहिती हक्क कायदा परिचय आणि विश्लेषण'' या पुस्तकाचा माहिती हक्क कायदा जाणून घेण्यासाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयोग होऊ शकतो, असे उद्गार एनआरआय आयुक्त तथा माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांनी काढले. गोवा सरकार राजभाषा संचालनालय आयोजित लेखक श्री. ढवळीकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
कला व संस्कृती संचालनालय, पणजी गोवा येथे गोवा राज्याचे माजी माहिती आयुक्त, संपादक संचालक फोमेंतो सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) मीडिया संजय ढवळीकर लिखीत ''माहिती हक्क कायदा परिचय आणि विश्लेषण'' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
एनआरआय आयुक्त तथा माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले. राजभाषा संचालनालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण व राजभाषा सचिव प्रसाद लोलयेकर, लेखक संजय ढवळीकर, राजभाषा संचालक सॅबी फर्नांडिस आदी उपस्थित होते.
यावेळी ॲड. सावईकर म्हणाले, २००५ साली आलेल्या माहिती हक्का कायद्याचा हेतू स्वच्छ आहे. आरटीआय ॲक्टीविस्ट हा यातील एक प्रकार आहे. यातील ॲक्टीविझमचा फायदा समाजाच्या भल्यासाठी होत असल्यास या कायद्याचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. अन्यथा, एखाद्याला त्रास देण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी दुरुपयोग देखील होतो. माहिती आयुक्त म्हणून लेखक संजय ढवळीकर यांनी आपल्या अनुभवातून हे पुस्तक लिहीले असून निश्चितच त्याचा फायदा माहिती हक्क कायदा समजून घेण्यासाठी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे गोवा सरकारचे शिक्षण व राजभाषा सचिव प्रसाद लोलयेकर यांनी मनोगत व्यक्त केले. पाऊस शरीराला आंघोळ घालतो. मात्र, लेखक पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या मनाला शुचिर्भूत करतो. सरकारी कार्यालयात माणूस देखील फाईल होऊन जातो असं म्हटलं जात. मात्र, संजय ढवळीकर यांच्यासारखी माणसं सरकारी कार्यालयात गेल्यास फाईलीही व्यक्त होतात अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पुस्तक परिचय करताना लेखक संजय ढवळीकर म्हणाले, माहिती हक्क कायदा ३० कलमांचा कायदा असून तो फार महत्त्वाचा आहे. राज्य माहिती आयुक्त असताना ३ वर्षांच्या कालावधीत अपिलात आलेल्या ७४० केसीस मार्गी लावता आल्याचे समाधान आहे. साहित्यिक म्हणून ललित लेख, संपादक म्हणून अग्रलेख लिहिण्याचा आनंद मिळाला. त्याची पुस्तकेही प्रकाशित झालीत. माहिती हक्क आयुक्त म्हणून कार्यरत असताना आलेल्या अनुभवातून समृद्ध होत लिहिलेल्या लेखांच आज पुस्तक समोर आलं आहे, याचा आनंद होत आहे असं मत लेखक श्री. ढवळीकर यांनी व्यक्त केले.
तसेच पुस्तक प्रकाशनासाठी राजभाषा संचालनालयाचे आभार मानले. यावेळी उज्वला ढवळीकर, शलाका ढवळीकर, निहार ढवळीकर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर आदींसह लेखक, राजभाषा संचालनालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग पार्सेकर यांनी केलं. तर मान्यवर परिचय पांडुरंग नाईक यांनी केला.








