
चिपळूण : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संघर्ष करणाऱ्या आणि आपल्या ८० वर्षीय आईसोबत झोपडीवजा घरात राहणाऱ्या असुर्डे येथील विलास रामचंद्र बने यांचे हक्काच्या घराचे स्वप्न अखेर साकार झाले. आई सुकाई देवी ग्रामविकास संघटनेने चार वर्षे सातत्याने पाठपुरावा करून आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विलास यांचे घरकुल मंजूर करून घेतले. मात्र मंजूर निधीतून घराचे बांधकाम पूर्ण करणे शक्य नसतानाही संघटनेचे सचिव व बांधकाम व्यावसायिक समीर चोगले यांनी कोणतीही मजुरी न घेता घर बांधून दिले. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गृहप्रवेश करण्यात आला. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडले आहे.
विलास बने हे अंध दिव्यांग असून आईसोबत झोपडीवजा घरात राहत होते. परिस्थितीमुळे त्यांच्या निवासाचा प्रश्न गंभीर बनला होता. ही बाब लक्षात घेऊन आई सुकाई देवी ग्रामविकास संघटनेचे अध्यक्ष सुधीर सावर्डेकर, उपाध्यक्ष अजित खापरे, सचिव समीर चोगले आणि नीलेश खापरे यांनी विलास यांना हक्काचे घर मिळावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले.
आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनातून या प्रयत्नांना यश आले आणि घरकुल मंजूर झाले. मात्र मंजूर निधी अपुरा असल्याने घराचे बांधकाम पूर्ण करणे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत संघटनेचे सचिव समीर चोगले मदतीला धाऊन आले. ते स्वतः बांधकाम कारागीर असून घरे, बंगले आणि शासकीय इमारतींच्या बांधकामाची कामे करतात.
घरकुलाच्या कामासाठी पंचायत समितीस्तरावरून निधीचे हप्ते वेळेत मिळावेत, यासाठी नवनिर्वाचित पं. स. सदस्य उज्ज्वला घाग यांनी सातत्याने प्रयत्न केले. तसेच महसूल विभागाकडून मोफत वाळू उपलब्ध करून देण्यासाठी नवनिर्वाचित जि. प. सदस्य संजय कदम यांनी सहकार्य केले. खेरशेतचे सरपंच नागेश साळवी यांनी वाळू वाहतुकीची व्यवस्था करून दिली. ग्रामसेवक भागवत आणि सरपंच पंकज साळवी यांनीही घरकुल उभारण्यासाठी विशेष सहकार्य केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








