LIVE UPDATES

बांबर्डेतील शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 23, 2026 10:29 AM
views 22  views
#kokansadlive#news update#konkan update#

दोडामार्ग  : वन्यप्राण्यांकडून शेती व फळबागांचे होणारे नुकसान, नुकसानभरपाई देण्यास होणारी दिरंगाई यांसह विविध मागण्यांसाठी बांबर्डे येथील दौलत राणे, मदन राणे आणि सिद्धेश राणे यांनी बुधवारी सकाळपासून दोडामार्ग वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर पुकारलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही गुरूवारी सुरू होते.

बांबर्डे येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी वनविभाग कार्यालयासमोर हे मुदत उपोषण छेडले. या उपोषणात शेतकऱ्यांनी विविध मागण्या ठेवल्या आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी  वनरक्षक शुभम वारके यांच्या कार्यक्षेत्रात मौजे बांबर्डे, घाटीवडे, या गावाचे कार्यक्षेत्र येत असून दोन्ही गावांमध्ये झालेल्या नुकसानीबाबत प्राप्त अर्जानुसार तातडीने जागेवर जाऊन पाहणी करणेबाबत संबंधित शेतकरी यांची भेट घेऊन आवश्यक लागणारे कागदपत्रे देण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार ते यापुढे त्यांच्या कार्यक्षेत्रात कामकाज करतील. तसेच जनमाहिती अधिकारी तथा वनक्षेत्रपाल दोडामार्ग यांच्याकडे माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये केलेल्या अर्जावर त्यांना मुदतीत माहिती न मिळाल्याने त्यांनी या कायद्यान्वये योग्य मार्गाने माहिती उपलब्ध करून घेण्याबाबत कार्यवाही करावी.​तसेच बांबर्डे राखीव वनक्षेत्रामध्ये साग, शिसम व दोडामार्ग वनक्षेत्रामध्ये खैर व इतर मौल्यवान झाडांची झालेल्या तोडीचे पुरावे या कार्यालयास सादर केल्यास नियममानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशा आशयाचे पत्र वनविभागाने उपोषणकर्त्यांना दिले. मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिल्याने दुसऱ्या दिवशीही गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत उपोषण सुरू होते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणीही  उपोषणकर्त्यांनी केली.