
देवगड : देवगड-जामसंडे शहरात बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर आली असून, गेल्या काही दिवसांत तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. घरातील नळ, पुरातन पितळी भांडी, चांदीची नाणी, देवघरातील चांदीची पूजेची भांडी तसेच इलेक्ट्रिक वायरिंगची बंडले असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. शहरात चोरट्यांचा वाढता वावर आणि बंद घरे फोडण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांप्रकरणी संबंधितांनी देवगड पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान, चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री सायरन वाजवत शहरात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.
देवगड-जामसंडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांची रेकी करून चोरी करण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. जामसंडे शिळोम येथील प्रसाद मोंडकर हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले. घराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील नळ, पुरातन पितळी भांडी, चांदीची नाणी तसेच देवघरातील चांदीची पूजेची भांडी असा ऐवज चोरून नेला.
या घटनेनंतर काही दिवसांतच जामसंडे आझादनगर परिसरातही घरफोडीचे प्रकार घडले. येथील विजय भास्कर घाडी यांच्या नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून इलेक्ट्रिक वायरिंगची बंडले लंपास केली. घराचा पुढील आणि मागील दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने घाडी यांना दूरध्वनी करून याबाबत माहिती दिली. घाडी यांनी घरी येऊन पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याच परिसरातील आणखी एका बंद घरातही चोरट्यांनी चोरी केली असून, तेथील नळ लंपास केले आहेत. या घटनांप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला असल्याची माहिती विजय घाडी यांनी दिली.
दरम्यान, शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांची दखल घेत देवगड पोलिसांनी रात्रीच्या गस्तीवर भर दिला आहे. मध्यरात्री सायरन वाजवत शहरात गस्त घालण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रात्री सायरनचा आवाज ऐकून नागरिक सतर्क होतील. तसेच पोलीस आपल्या परिसरातून गस्त घालत असल्याची जाणीव नागरिकांना होऊन संभाव्य चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल, असा या उपक्रमामागील उद्देश आहे. हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी दिली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








