LIVE UPDATES

Dodamarg News : दोडामार्गात जिजाऊ संघटनेतर्फे मोफत वह्यांचे वाटप

निलेश सांबरेंचा उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 22, 2026 04:39 PM
views 30  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

दोडामार्ग : ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि जिजाऊ संघटना सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने दोडामार्ग तालुक्यातील दहा माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण कोकणात ३५ लाख वह्या वाटप करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला असून, त्याचाच एक भाग म्हणून दोडामार्ग तालुक्यात हा उपक्रम उत्साहात पार पडला.

  या उपक्रमांतर्गत दोडामार्ग इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, श्री नवदुर्गा माध्यमिक विद्यालय (आई), माध्यमिक विद्यालय माटणे, माध्यमिक विद्यालय मांगेली, न्यू इंग्लिश स्कूल अँड आर्ट्स, कॉमर्स ज्युनिअर कॉलेज भेडशी, करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूल साटेली, एम. आर. नाईक विद्यालय कोनाळकट्टा, माध्यमिक विद्यालय सोनावल, कीर्ती विद्यालय घोटगेवाडी तसेच न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी या शाळांतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

  या कार्यक्रमांना माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे, माजी सरपंच तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग बोर्डेकर, माजी सभापती आनंद रेडकर, साटेली-भेडशीच्या सरपंच छाया सखाराम धर्णे, पं. स. सदस्य संजय सातार्डेकर, भाजपचे सरचिटणीस सिद्धेश पांगम, सामाजिक कार्यकर्ते सुभाष गवस, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण मनोहर खांबल, संतोष हडीकर, सुशांत राऊत, संतोष म्हावळणकर आणि सत्यवान गवस यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन कोऱ्या वह्या हातात मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. केवळ मदत न करता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणारा आणि त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा हा उपक्रम असल्याची भावना शिक्षक व ग्रामस्थांनी व्यक्त केली.

कोकणातून अधिकारी घडविण्याचे स्वप्न : 

 यावेळी जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. ते म्हणाले, आज आम्ही विद्यार्थ्यांना वह्या देत आहोत; मात्र उद्या याच कोकणातून मोठमोठे अधिकारी घडले पाहिजेत, हे आमचे स्वप्न आहे. कोकणातील विद्यार्थ्यांनी, विशेषतः विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेऊन अधिकारी बनण्याचे ध्येय उराशी बाळगावे.

त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिजाऊ संस्था सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. कोकणातून शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तन घडविणे हेच माझे ध्येय असून, शेवटच्या श्वासापर्यंत कोकणासाठी काम करत राहीन, असे स्पष्ट केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिजाऊ संघटनेचे ओमकार तिवरेकर, वैभव मसणे आणि ज्ञानेश्वर नेवरेकर यांनी विशेष मेहनत घेत नियोजन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.