
सावंतवाडी : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांवर होणारे हल्ले, चावा घेण्याच्या घटना आणि रेबीजचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी राज्य शासन, जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडे सविस्तर निवेदनाद्वारे मागण्या केल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये लहान बालके, शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांना घराबाहेर पडताना, बाजारात जाताना तसेच शाळेत ये-जा करताना भीतीच्या वातावरणात वावरावे लागत आहे. दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे लागल्याने अपघात होण्याचे प्रकारही घडत आहेत.
भटक्या कुत्र्यांची संख्या वाढण्यामागे योग्य नसबंदी, लसीकरण आणि नियंत्रणात्मक उपाययोजनांचा अभाव असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात शासनामार्फत भटक्या कुत्र्यांची पकड मोहीम राबवून पशुवैद्यकीय विभागाच्या माध्यमातून त्यांची नसबंदी व रेबीज प्रतिबंधक लसीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पकडलेल्या कुत्र्यांना रस्त्यावर पुन्हा सोडण्याऐवजी शासनाच्या वनजमिनीवर स्वतंत्र निवारा केंद्र उभारून तेथे पाणी, खाद्य आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या केंद्रांमध्ये कुत्र्यांची देखभाल करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक वाहनांची सुविधा असावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनातील अन्य महत्त्वाच्या मागण्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी व्यापक नसबंदी मोहीम, नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा, कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई यांचा समावेश आहे.
भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये अँटी रेबीज व्हॅक्सिन (ARV) आणि अँटी रेबीज सिरम (ARS) पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे. अनेक ठिकाणी लसीकरण व उपचारांच्या सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
याशिवाय, भटक्या कुत्र्यांना खाद्य देण्यासाठी निश्चित जागा उपलब्ध करून द्यावी. सार्वजनिक ठिकाणी किंवा नागरिकांच्या घराबाहेर खाद्य टाकल्यामुळे निर्माण होणारे वाद आणि त्रास टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य धोरण निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या जीवितरक्षणासाठी शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन महाराष्ट्र राज्यासह प्रत्येक जिल्ह्यात तातडीने ठोस आणि सहानुभूतीपूर्वक उपाययोजना कराव्यात. हा प्रश्न लोकसभा व विधानसभा अधिवेशनात उपस्थित करून आवश्यक धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी विनंती राजेंद्र प्रभाकर मुसुरकर यांनी केली आहे.
नागरिकांचे जीव वाचवणे आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर मानवी दृष्टिकोनातून कायमस्वरूपी तोडगा काढणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








