LIVE UPDATES

कणकवलीत 'बंटी - बबली'ची हातसफाई

दोन महिलांच्या पर्स चोरल्या ; CCTV मध्ये कैद
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 10, 2025 17:22 PM
views 1877  views

कणकवली : कणकवली बाजारपेठेत मंगळवारी, आठवडा बाजारदिनी एका चोरट्या जोडप्याने थैमान घातले. जोडप्याने बाजारात खरेदी करत असलेल्या दोन वेगवेगळ्या ग्राहकांच्या पर्समधील पैसे लंपास केल्याची घटना सकाळी ११.३० वा. सुमारास घडली. सदर जोडप्याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, दुपारी २ वा. पर्यंत जोडपे सापडू शकलेले नाही.

आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या एका वृद्धेला आपले पैसे चोरल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्यासोबतच्या मुलीने नजीकच्या दुकानदारांना सांगितले. एका दुकानदाराने आपले सीसीटीव्ही तपासले असता चोरी करणारे जोडपे व त्यांच्यासोबत असलेले लहान मुल दिसून आले. त्यानंतर वृद्धेसोबतच्या मुलीने सदर जोडपे ज्या दिशेने गेले, तेथे शोध घेतला असता येथील ढालकाठीदरम्यान जोडपे दिसून आले. अर्थात मुलीने त्यांच्याकडून आपली पर्स काढून घेतली. त्यावेळी काही नागरिकांनी जोडप्यास 'प्रसाद'ही दिला. मात्र, त्यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा एका महिलेचे पाकीट चोरल्याची घटना घडली.

अखेरीस कुणीतरी माहिती दिल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे, पोलीस नाईक दिगंबर घाडीगांवकर, राजेश पाटील आदींनी बाजारपेठेत धाव घेतली. चोरट्या जोडप्याकडून चोरीचे प्रकार सुरूच राहण्याच्या शक्यतेने पोलिसांनी जोडप्याचा शोध सुरु केला. मात्र, दुपारी २ वा. पर्यंत चोरी करणारे जोडपे सापडलेले नाही.