
- शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी मानले आभार
सावंतवाडी : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य शासनाने अवघ्या १२ तासांच्या आत २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार श्री. राणे यांनी दिलेला शब्द पाळून कोकणातील शेतकऱ्यांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. त्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांचे जाहीर आभार मानले. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी शिवसेनचे जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, उपतालुका प्रमुख राकेश पवार आदी उपस्थित होते. श्री. परब म्हणाले, ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत कडाक्याची थंडी आणि अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा व काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आमदार निलेश राणे यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. काल पावसाळी अधिवेशनात त्यांनी हा विषय अत्यंत आक्रमकपणे मांडत कृषिमंत्र्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न लावून धरले. बागायतदारांची प्रत्यक्ष परिस्थिती, कृषी विद्यापीठाने केलेले सर्वेक्षण आणि उपलब्ध आकडेवारी सभागृहात मांडून त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि ठाम भूमिकेमुळे शासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागला, असेही त्यांनी सांगितले.
शासन निर्णयानुसार एनडीआरएफ अर्थात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना इनपुट सबसिडी स्वरूपात मदत दिली जाणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार प्रती हेक्टर २२ हजार ५०० रुपये दराने ही मदत वितरित केली जाईल. संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या निर्णयाचा लाभ ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील पाच जिल्ह्यांतील एकूण १ लाख ३४ हजार २५१ शेतकऱ्यांना होणार आहे. सुमारे ९२ हजार ३४२.७८ हेक्टर क्षेत्रावरील आंबा व काजू बागांचे नुकसान ग्राह्य धरून शासनाने मदत मंजूर केली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९८.४४ कोटी रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ७९.०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचेही परब यांनी स्पष्ट केले. २०१३ नंतर प्रथमच आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना अशा प्रकारची नुकसानभरपाई मिळत आहे. यासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि प्रयत्न यशस्वी ठरले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला आहे. आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनात हा विषय घेतला नसता तर आज शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचलेच नसते. त्यामुळे आपण त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पैसे हे नुकसान भरपाई पोटी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. तर उर्वरित दुसरा टप्पाही लवकरच जमा होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्भवलेल्या समस्यांमुळेच आपण गेलो नाही !
शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेता आपण काश्मीर येथे अभ्यास दौऱ्यासाठी गेलो नाही. जे नगरसेवक गेले आहेत ते फिरण्यासाठी नाही तर अभ्यास दौऱ्यासाठी गेलेत, मी एकटा त्या ठिकाणी काम करून घेण्यासाठी पुरेसा आहे. शहरात सद्यस्थितीत नागरिकांना भेडसावणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्या लक्षात घेता आपण दिलगिरी व्यक्त करतो. शहरातील समस्यांचा आपण आढावा घेतला असून तशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. आम्ही नगरपालिकेत विरोधी बाकावर बसत असलो तरीही राज्यात एकत्र सत्तेत आहोत. त्यामुळे शहरातील चुकांवर आपण बोट ठेवतो, जेणेकरून त्या चुका सुधाराव्यात. शेवटी नागरिकांचे हित दृष्टीसमोर ठेवून आम्ही काम करीत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.










