
सिंधुदुर्गनगरी : सुकळवाड बस स्टॉप रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता झालेल्या भीषण अपघातात भंडारवाडी (सुकाळवाड) येथील जगदीश मांजरेकर यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या बोलेरो निओ वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोखून धरत तीव्र आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होऊन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा बोलेरो निओ या पोलिसांच्या वाहनाची हिरो डूइट (एमएच 07 एई 3833) या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, जगदीश मांजरेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचा पूर्ण चक्काचूर झाला असून पोलिसांच्या वाहनाच्या समोरील भागाचेही मोठे नुकसान झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे वाहन महिला चालक चालवत होत्या. मात्र अपघातानंतर संबंधित चालक घटनास्थळी नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. वाहन तेथेच सोडून चालक निघून गेल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि रस्ता अडवून धरला.

घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी ग्रामस्थांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या दुर्दैवी अपघातामुळे सुकाळवाड परिसरात शोककळा पसरली असून, संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.













