
सावंतवाडी : सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न अखेर निकाली लागला आहे. त्यामुळे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात यासंदर्भात राजघराण्याच्या दोन्ही कुटुंबात तडजोड झाली आहे. तर हा प्रश्न मार्गी लागण्याचे खरे श्रेय कोर्टाला दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
आम. केसरकर म्हणाले, लोकांचे हीत लक्षात घेऊन कोर्टाने तातडीने ५० गुंठे जागा चार आठवड्यांत हस्तांतरित करण्याचे आणि उरलेल्या जागेवर शासनाने हॉस्पिटल बांधण्याचे निर्देश दिले आहेत. आज संध्याकाळपर्यंत त्याची ऑर्डर हातात येणार आहे. ज्यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यात महाराष्ट्राचे मुख्य ॲड. शिरीष हिरे यांचे विशेष आभार मानले पाहिजेत. या केससाठी ते मुद्दाम आले होते. जेव्हा त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य कळले आणि मी त्यांच्याशी फोनवर बोललो, तेव्हा ते स्वतः आले त्यांनी पाहणी केली आणि अत्यंत प्रभावीपणे केस मांडली.
त्याचबरोबर राजघराण्याचे जे दोन्ही भाग आहेत, त्यांनीही आपापली प्रतिज्ञापत्रे वेळेवर सादर केली. सावंतवाडीचे राजेसाहेब खेम सावंत आणि युवराजांनी व श्री व सौ. भोगले घराण्याचेही चांगले सहकार्य लाभले. तसेच या प्रश्नांसाठी मेहनत घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे विशेष धन्यवाद देतो. चार वर्षांपूर्वीच हे होऊ शकले असते. मात्र, दोघांचे एकत्र प्रतिज्ञापत्र असावे असे सांगितल्यामुळे ते होऊ शकले नाही. आता कोर्टाने स्वतंत्र प्रतिज्ञापत्रे मान्य केली आणि हा निर्णय दिला आहे. याबद्दल आम्ही न्यायालयाचे ऋणी आहे. विशेषतः रुग्णांना गोव्याला न्यावे लागल्यामुळे होणाऱ्या अडचणी आणि लोकांचे जाणारे जीव, या सगळ्या गोष्टींचा न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने निर्णय दिल्याचे सांगत श्री. केसरकर यांनी आभार मानले.
सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाला २०१८ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी रुग्णालयासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. टेंडर देखील मंजूर करण्यात आले होते. मात्र, जागेच्या वादामुळे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे काम प्रत्यक्षात सुरू होऊ शकले नव्हते. आमदार दीपक केसरकर यांनी हे रुग्णालय उभारण्यासाठी राजघराण्यात तडजोड घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून गुरुवारी यासंदर्भात राजघराण्यात तडजोड झाली आहे. जागेचा प्रश्न मार्गी लागल्याने सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.











