LIVE UPDATES

आंबोली वाहतूक कोंडीवर स्थळ भेटीतून नियोजनाचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांची आढावा बैठक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 20, 2026 20:41 PM
views 43  views

सिंधुदुर्गनगरी : आंबोली घाटातील तीव्र वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांची आढावा बैठक पार पडली. वीकेंड आणि सलग सुट्ट्यांच्या काळात महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकमधून येणाऱ्या हजारो पर्यटकांच्या वाहनांमुळे अरुंद घाटात मोठी कोंडी होते. मुख्य धबधबा, कावळेसाद पॉईंट आणि हिरण्यकेशी परिसरात रस्त्याच्या कडेला होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवा अडकून पडतात. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष उपाययोजना राबवण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व विभागांना संयुक्त स्थळ पाहणी करून तातडीने नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

या बैठकीस उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्यासह पोलीस, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, आरोग्य व स्थानिक ग्रामपंचायतीचे अधिकारी उपस्थित होते. सर्व संबंधित विभागांनी एकत्रित स्थळ भेट देऊन अधिकृत वाहनतळांसाठी (पार्किंग) जागा निश्चित कराव्यात.

घाटाच्या देान्ही बाजूने वाहने थांबवून तिथून मुख्य पर्यटन पॉईंट्सवर पर्यटकांची ने-आण करण्यासाठी वन विभागाची वाहने वापरणे किंवा जिल्हा वार्षिक योजनेतून स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्याबाबत चाचपणी केली जाईल. एमटीडीसीच्या जागेत वाहनतळ उभारणीच्या तांत्रिक बाबी तपासण्यासह आवश्यकतेनुसार खाजगी जागांचा शोध घेऊन अतिरिक्त पार्किंगचे नियोजन केले जाईल. 

पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर वाहनतळ सुरू करून मुख्य धबधबा परिसरात कडक ‘नो पार्किंग झोन’ लागू करण्यात येईल. वाहतूक नियोजनासोबतच प्रत्येक पर्यटन स्थळावर चोख स्वच्छता राखणे आणि पर्यटकांसाठी ठिकठिकाणी मार्गदर्शक व सूचना फलक लावण्याचे आदेश ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत. या सर्व उपाययोजनांचा प्रत्यक्ष स्थळ पाहणी अहवाल तयार करून पुढील गुरुवारी अंतिम आराखडा सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.