
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे, चौकुळ, नेने, मसुरे आणि केगद गावांमधील दीर्घकाळ प्रलंबित कबुलायतदार गावकर जमिनींचा प्रश्न डिसेंबरपूर्वी मार्गी लावण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे, प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
या गावांतील ४ हजार ७१८ हेक्टर जमीन शेतकऱ्यांच्या नावावर करून त्यांना ‘वर्ग १’ धारणाधिकाराने प्रत्यक्ष ताबा देण्याचे निर्देश त्यांनी दिले. वनविभाग व खासगी वन आरक्षणामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. गेळे येथील २६९ कुटुंबांची अंतिम यादी निश्चित असून, २५३ पात्र कुटुंबांना व्यावसायिक प्रयोजनासाठी भूखंड वाटप पूर्ण झाले आहे. चौकुळ, नेने व मासुरे प्रकरणांतील न्यायालयीन अडचणींवरही सकारात्मक मार्ग काढण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.












