
सावंतवाडी : माडखोल येथे आज पुन्हा एकदा टेम्पो आणि इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार युवक जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवक हा दाणोली येथून सावंतवाडीच्या दिशेने इलेक्ट्रिक दुचाकीवरून येत होता. माडखोल परिसरात मागून आलेल्या एका टेम्पोने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी युवकाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. जखमी युवक हा दाणोली परिसरातील असल्याचे समजते. सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सावंतवाडी-गोवा मार्गावर वाहतुकीची कोंडी तसेच अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी माडखोल परिसरातून वाहने सावकाश चालवावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून करण्यात येत आहे.











