
वैभववाडी : राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) विविध खाद्यपदार्थ व अन्नप्रक्रिया उत्पादनांवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक व पौष्टिक रानभाज्यांचे आहारातील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. रानभाज्यांचा आहारातील वापर वाढविण्यासाठी तसेच त्यांचे योग्य पद्धतीने मार्केटिंग करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच फास्ट फूडकडे वळलेल्या तरुण पिढीला रानभाज्यांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे असे मत पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी व्यक्त केले.
आत्मा समिती वैभववाडी, उमेद वैभववाडी आणि एडगाव ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने एडगाव ग्रामपंचायत सभागृहात तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव, रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती रावराणे बोलत होते. या कार्यक्रमाला उपसभापती साची कोलते, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक प्रगती तावरे, आत्मा समितीचे अध्यक्ष मंगेश कदम, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, जयेंद्र रावराणे, सुधीर नकाशे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, देवानंद पालांडे, साधना नकाशे, सरपंच रविना तांबे आदी उपस्थित होते.
सभापती रावराणे म्हणाले, नवीन पिढी फास्ट फूड आणि रेडी-टू-कुक पदार्थांच्या आहारी जात आहे. त्याचे दुष्परिणाम आता आरोग्यावर जाणवू लागले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या कारवाईमुळे आपण चवीने खात असलेल्या अनेक खाद्यपदार्थांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यामुळे पारंपरिक, नैसर्गिक आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असलेल्या रानभाज्यांचे महत्त्व निश्चितच वाढणार आहे. जेव्हा नवी पिढी रानभाज्यांचे महत्त्व समजून घेऊन त्याचा आग्रह धरेल तेव्हाच असे महोत्सव केल्याचे फलित होईल असे रावराणे यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले,गेल्या काही वर्षांत रानभाज्यांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले. मात्र, त्यातील पोषणमूल्य आणि औषधी गुणधर्म लक्षात घेता त्या पुन्हा आपल्या दैनंदिन आहाराचा भाग बनणे आवश्यक आहे. रानभाज्यांची मागणी वाढली तर त्याचा थेट फायदा स्थानिक शेतकरी व महिलांच्या बचत गटांना होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनाबरोबरच रानभाज्यांच्या विक्री व मार्केटिंगसाठीही प्रयत्न झाले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृहाजवळील जागेत रानभाज्या तसेच गावठी भाज्यांच्या विक्रीसाठी व्यवस्था करता येईल का, याबाबतही प्रयत्न केले जातील, असे रावराणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी डॉ. विजय पैठणे यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व विशद केले. वैभववाडी परिसरात तब्बल १५४ प्रकारच्या रानभाज्या सहज उपलब्ध होतात. त्यापैकी अनेक रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर करून पिकविल्या जाणाऱ्या भाज्यांपेक्षा नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचा आहारात समावेश करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कृषी विभागाच्या कारभारावर जयेंद्र रावराणेंची नाराजी
तालुक्यात आत्मा समिती चांगले काम करीत असली तरी कृषी विभागाचे नेमके काम काय सुरू आहे, हे अद्याप दिसून येत नाही. केवळ या विभागाच काम दुसऱ्यांच्या कार्यक्रमात फोटो काढणं एवढंच आहे. अशा शब्दांत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाकडून ठोस नियोजन दिसत नसल्याने विभागाचा कारभार असमाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.










