LIVE UPDATES

माझ्यासाठी 'हा' सन्मान समाजासाठी आणखी जोमाने काम करण्याची नवी जबाबदारी

पुरस्कार प्राप्त फिजा मकानदार : 'जिल्हा युवा पुरस्कार' प्रदान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 20:55 PM
views 38  views

सिंधुदुर्गनगरी : 'जिल्हा युवा पुरस्कार' माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर समाजासाठी आणखी जोमाने, प्रामाणिकपणे आणि संवेदनशीलतेने काम करण्याची नवी जबाबदारी आणि प्रेरणा आहे. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या कुटुंबीयांचे, मित्र-मैत्रिणींचे, सहकाऱ्यांचे आणि माझ्या प्रत्येक कार्यात खंबीरपणे साथ देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. हा सन्मान माझा एकट्याचा नाही. माझ्या संघर्षाचा, माझ्या माणसांचा आणि समाजासाठी काम करण्याच्या माझ्या जिद्दीचा आहे असे पुरस्कार प्राप्त फिजा मकानदार यांनी सांगितले. याबाबत त्यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे माहिती दिली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने सामाजिक कार्य, शैक्षणिक उपक्रम, स्वच्छता मोहीम, क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबिर तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सावंतवाडी तालुक्यातील जयराम जाधव, फिजा मकानदार आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांची प्रमुख उपस्थिती होती.