
दोडामार्ग : आडाळी औद्योगिक कृती समितीच्या पाठपुराव्यानंतर अखेर येथील औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. समितीच्या वतीने अध्यक्ष पराग गांवकर यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. गेल्या दोन वर्षांपासून उद्योजकांना भूखंडांचा ताबा देण्यास सुरुवात झाली. तसेच पायाभूत सुविधांची कामे पूर्णत्वाला आली. त्यामुळे येथील साधनांची व उद्योजकांच्या भूखंडांची सुरक्षितता, तसेच या क्षेत्रात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक कृती समितीच्या वतीने अध्यक्ष पराग गांवकर व सचिव प्रवीण गांवकर यांनी वारंवार महामंडळ प्रशासनाकडे सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली.
सततच्या पाठपुराव्यानंतर महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने सुरक्षा रक्षक नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर महामंडळाकडून सात सुरक्षा रक्षकांची आडाळी औद्योगिक क्षेत्रात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच औद्योगिक क्षेत्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर लाठीचा अडथळा निर्माण करण्यात आला असून, सिक्युरिटी केबिनचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.
याबाबत सरपंच पराग गांवकर म्हणाले की, येथील औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे पूर्णत्वाला आल्यानंतर आम्ही सुरक्षा रक्षक नेमण्याचा आग्रह धरला. येथील सुसज्ज रस्ते व निर्मनुष्य वातावरणामुळे अनेक जण या भागात वाहन शिकण्यासाठी, बंधाऱ्यावर आंघोळीसाठी येतात. महामंडळ, कंत्राटदार व उद्योजकांच्या अनेक किमती वस्तू या ठिकाणी आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आवश्यक होती.
आता ४८ उद्योजकांनी आडाळीत भूखंड घेतले असून काहींनी उद्योगांच्या उभारणीला सुरुवात केलेली आहे. तर दोन मोठे उद्योग आडाळीत येणार आहेत. अशावेळी येथील कायदा व सुव्यवस्था, तसेच सामाजिक शांतता कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची भूमिकादेखील महत्त्वाची ठरणार आहे.
त्यामुळे दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आडाळी एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलीस आऊट पोस्ट सुरू करावे किंवा सध्या बंद स्थितीत असलेले कळणे आऊट पोस्ट पुन्हा सुरू करावे. तशी लेखी मागणी लवकरच प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे करण्यात येईल, असे सरपंच पराग गांवकर यांनी सांगितले.










