LIVE UPDATES

पालकमंत्र्यांच्या हस्ते जयराम जाधव यांना 'जिल्हा युवा पुरस्कार' प्रदान

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 21:30 PM
views 35  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, पंचायत सदस्य आणि सामाजिक प्रशिक्षक जयराम जाधव यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'जिल्हा युवा पुरस्कार' पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

१५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा मुख्यालय ओरस येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री राणे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जयराम जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून समर्पित भावनेने सामाजिक क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत. समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या युवकांच्या कार्याला सलाम करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार सन 2024-25 जाहीर करण्यात आले होते. यात सावंतवाडी तालुक्यातील जयराम जाधव, फिजा मकानदार आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग यांना हे पुरस्कार वितरित करण्यात आले.