
सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिग्गजांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संजू परब यांच्यावर जनतेच प्रेम असून जनताच त्यांना आमदार बनवेल, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर व शिवसेनेचे आमदार निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री श्री. सामंत म्हणाले, पक्षाशी व नेत्यांशी सदैव प्रामाणिक राहणाऱ्या संजू परब यांच्या चेहऱ्यावर नेहमी हासू कायम राहावे. निलेश राणेंना असा सहकारी लाभला हे त्यांच भाग्य असून आता आमचही भाग्य आहे. दीपक केसरकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते काम करत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. 'ताज'चा सामंजस्य करार झाला असून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा होऊन दीपक केसरकर यांचे स्वप्न साकार होणार आहे. तसेच दाओसला झालेल्या एमओयू नुसार ४ हजार कोटींचा प्रकल्प आडाळीत आणण्याचे आजच मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राणे कुटुंबावर टीका झाल्यावर प्रथम उत्तर देणारा संजू होता. राणे कुटुंबाची तो ढाल असून शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्या, जनसेवेत समाजकारणात झोकून द्या, जनताच तुम्हाला आमदार करेल असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त करत संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मी सहजासहजी वारस निवडत नाही : दीपक केसरकर
सावंतवाडी मतदारसंघाला फार मोठा इतिहास आहे. संस्थांचे राजे शिवरामराजे भोसले आणि माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांनी घालून दिलेल्या लोककल्याणाचा वारसा पुढे नेण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी विकासात्मक कामांवर भर देण्यासह जनहितासाठी मेहनत घ्यावी, जनताच तुम्हाला आमदार बनवेल असं मत व्यक्त केले. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव खासदारकीला सुचवल्यामुळे आपल्याला थेट मंत्रीपद नाकारण्याची धमकी देण्यात आल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. तर आपण सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. संजू परब यांच संघटनात्मक कौशल्य दखल घेण्यासारख आहे. मी सहजासहजी वारस निवडत नाही. मात्र, संजू परब यांची जबाबदारी स्वीकारली असल्याचे विधान श्री. केसरकर यांनी केले.
संजू, माझ्या घरचा सदस्य : आम. निलेश राणे
गेली अनेक वर्षे संजू परबचा एकही वाढदिवस मी चुकवला नाही. तो माझ्या घरचा सदस्य आहे, माझ्या भावासारखा आहे. माझ्या राजकीय संघर्षात ज्या काही व्यक्ती माझ्या सोबत कायम राहिल्या, त्यात अग्रक्रमाने घेतलं जाईल असं नाव म्हणजे संजू परब आहे. माझ्या संघर्षातील १० वर्षांच्या काळात मला पुन्हा पुन्हा जिल्ह्यात आणणारा हा माझा मित्र आहे. आजवर त्याला काहीच देऊ शकलो नाही. पण माझ्यावर तसंच दीपक केसरकर यांच्यावर झालेल्या टीकेला पहिलं उत्तर देणारा तो आहे. मात्र, जोपर्यंत दीपक केसरकर ग्रीन सिग्नल देत नाहीत, तोपर्यंत गोष्टी अवघड असतात. त्यामुळे संजू परब आणि मनिष दळवी यांनी त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल घ्यावा अन् स्वप्न पहावी. अन्यथा, तुमचे केस पिकतील असाही मिश्किल टोला हाणला. संजू आणि मनिष ही आमच्या घरचीच मुलं आहेत. त्यामुळे ते दोघेही मोठे व्हावेत अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

नारायण राणेंच्या शब्दाबाहेर जाणार नाही : संजू परब
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांसारख्या दिग्गज नेत्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त येऊन मला शुभेच्छा दिल्या हे माझ्यासाठी मोठ आहे. सावंतवाडीची जागा शिवसेनेची आहे हे मंत्री सामंत यांनी म्हंटल्यावर आणखीन बळ आलं आहे. मात्र, खासदार नारायण राणे यांच्या शब्दाबाहेर मी कधीही जाणार नाही. त्यांच्यासोबतच या सर्व नेत्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, हीच माझ्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठी शिदोरी असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आदींनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती सुस्मिता जाधव, संजय पडते, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत कविटकर, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, अशोक दळवी, आनंद शिरवलकर, सुनील डुबळे, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडीस, समीधा रेडकर, सचिन देसाई, रुपेश कानडे, बाबू कुडतरकर आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन वालावलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रेमानंद देसाई यांनी केले. शेकडोंच्या संख्येने उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते, संजू परब मित्रमंडळींनी उपस्थित राहत वाढदिनी संजू परब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.











