LIVE UPDATES

सावंतवाडी बाजारपेठेत ९६ हजारांचा बेकायदेशीर गुटखा जप्त

एकाला अटक ; सावंतवाडी पोलिसांची धडक कारवाई
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 18:00 PM
views 111  views

सावंतवाडी : मानवी आरोग्यास घातक आणि बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने गवत मार्केट परिसरात ही धडक कारवाई करत ९६ हजार १०२ रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी येथील पेट्रोल पंपाच्या बाजूस असलेल्या गवत मार्केटमधील पानपट्टी स्टॉल समोर बेकायदेशीर गुटखा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत संशयित अमिन अब्दुलगणी शाह (रा. बुरान गल्ली, बाहेरचा वाडा, सावंतवाडी) याच्या ताब्यातून ९६ हजार १०२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा साठा हस्तगत करण्यात आला.

आरोग्यास अपायकारक आणि असुरक्षित असलेला गुटखा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय कोरगावकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अमिन शाह याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, साहाय्यक पोलीस निरीक्षक खंदरकर आणि पोलीस हवालदार जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. खंदरकर करत आहेत.