LIVE UPDATES

धान्य गोडाऊनमधील कीटकांच्या उपद्रवामुळे ग्रामस्थ हैराण

निष्काळजी पुरवठा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची रुपेश पावसकरांची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 22, 2026 01:24 PM
views 61  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कुडाळ : नेरूर गावात रात्रीच्या वेळी घरात मोठ्या प्रमाणावर कीटक व टोके शिरत असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. या कीटकामुळे नागरिकांना त्वचेला खाज सुटणे, ॲलर्जी, खोकला असे आजार जडले असून कान-नाकात कीटक जाण्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. आरोग्य विभागाने या भागाची पाहणी केली असता ही वस्तुस्थिती सत्य असल्याचे समोर आले असून त्यांनी याबाबतचा अहवालही दिला आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

नेरूर गोंधीयाळे गोडाऊनमुळे कीटकांची उत्पत्ती वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून दोन दिवसांपूर्वी हे गोडाऊन तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी या विषयाचे कोणतेही गांभीर्य न दाखवता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.

रुपेश पावसकर म्हणाले की, "नागरिकांच्या समस्यांसंदर्भात जेव्हा आम्ही पुरवठा अधिकारी विजय सहारे यांच्याकडे गेलो, तेव्हा ते आपल्या खुर्चीवर झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. इतकेच नव्हे तर या प्रकरणी चुकीच्या पद्धतीने अहवाल बदलून देण्यासाठी दबाव आणणाऱ्या आणि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा." अशी मागणी केली आहे.

नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग आणि आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार करून रीतसर तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती रुपेश पावसकर यांनी दिली.प्रशासनाने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संबंधित गोडाऊन बंद न केल्यास आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.