
वेंगुर्ला : मनीष दळवी हे लहान वयापासून राजकारणात आले. प्रथम त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणूनही काम केल. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जिथे असतात तेथे मनापासून आणि निष्ठेने काम करतात. जिल्हा बँकेला त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या संयमी, शांत स्वभाव आणि नेतृत्व गुणामुळे भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. असे अनेकांनी आपल्या भाषणात सांगितले ते खरं आहे म्हणूनच त्यांना यापेक्षाही मोठी पदे मिळू दे आणि त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळुदे अशी मनापासून अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी वेंगुर्ले येथे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी मनीष दळवी यांच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
वेंगुर्ले येथे साई दरबार हॉलमध्ये मनीष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त मनीष दळवी मित्र मंडळ तर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भागिनाथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, भाजपा वेंगुर्ले तालुका अध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, वेंगुर्ले चे उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, समिधा नाईक तसेच महेश धुरी, जिल्हा परिषद सदस्य सौ. सातोस्कर, सुनील राऊळ, रवी मडगावकर, विद्याधर परब तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगरसेवक, सरपंच, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी एका धुरंधर नेतृत्वाचा वाढदिवस साजरा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. मनीष दळवी यांच्या कामाची व्याप्ती यापुढेही उत्तरोत्तर व्यापक होत जावो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. ज्यावेळी मनीष दळवी यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत एक पाऊल माघार घेतली त्याच वेळी ते पुढे मोठी झेप घेतील हे निश्चित झाले असून ते सन २०२९ मध्ये आमदार होतील. यासाठी मी स्वतः त्यांच्यासाठी प्रचार करणार आणि निवडून आणणार हा शब्द आहे असे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी शुभेच्छा देताना स्पष्ट केले.
या मतदारसंघात आमदार म्हणून त्यांच्या व्यतिरिक्त अजून एकही उमेदवार डोळ्यासमोर येत नाही. या भागातील नागरिकांचे तेच म्हणणे आहे, त्यामुळे ते आमदार नक्की होतील. भावी आमदार म्हणून हा मतदारसंघ त्यांच्याकडे पाहत आहे. मी पण राणे साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, पण मनीष ने नंतर येऊनही आपलं एक वेगळेपण जपलं आहे. म्हणूनच हे होतकरू नेतृत्व पुढे गेले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. राणे साहेबांवर प्रेम करून त्यांच्या जवळचा सहकारी होणे मोठी गोष्ट आहे. मनीष दळवी यांनी आपल्या कामाने नाव कमावले आहे. समाजाचे काम करताना त्यांना कोणताही पक्ष लागत नाही. ते प्रामाणिकपणे काम करतात. केली अनेक वर्ष आम्ही त्यांचे काम बघत आहोत. काम करण्याचा किंवा पद उपभोगण्याचा कोणताही अविर्भाव त्यांच्याकडे नसतो. म्हणूनच भविष्यातही त्यांना काम करण्यासाठी मोठी संधी आहे, आम्ही त्यांच्या सदैव सोबत आहोत, असे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी सांगितले.
सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून मनीष दळवी यांचे काम सुरू आहे. उत्कृष्ट नियोजनाने काम करून त्यांनी बँक चालवली नाही तर धाववली आहे. त्यांच्या सोबत काम करताना उत्साह वाटतो. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे दळवी इकडे तिकडे सहकार चळवळ वाढविण्यासाठी पळत असतात. ते आम्हाला कधी राजकारणी वाटत नाहीत. त्यांनी हा निस्वार्थ भाव असाच जपावा असे डॉ. प्रसाद देवधर यांनी सांगितले. दरम्यान यावेळी महेश सारंग, सुनील राऊळ, सचिन देसाई, रवी मडगावकर यांच्या सह अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना दळवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नगरसेवक प्रशांत आपटे यांनी मानले.
वाढदिवसानिमित्त दिवसभर आयोजित कार्यक्रमात सर्वांकडून मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे नव्या दमाने काम करण्याची पुन्हा ताकद मिळाली. आमचे मार्गदर्शक नारायणराव राणे साहेब यांनीच खऱ्या अर्थाने माझ्या या सगळ्या राजकीय वाटचालीला दिशा दिली. राणेसाहेब हाच माझा पक्ष आणि हीच माझी दिशा निश्चित आहे. त्याच्यापुढे मला कोणतेही पद मोठे नाही. त्यामुळे राणे साहेबांनी जेव्हा जेव्हा जी जबाबदारी टाकली ती चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा बँकेतील प्रगती ही माझ्या एकट्यामुळे झाली नसून सर्वांचे मार्गदर्शन आणि आपणा सर्वांचे सहकार्य यामुळेच झाली आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे, अशी कबुली देत मनीष दळवी यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.
पाच वर्षांपूर्वी जिल्हा बँक निवडणुकीवेळी राजकीय पटलावर घडलेल्या घटना सांगून राणे साहेबांनी आपल्याला या जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर नेऊन बसवले. तो क्षण माझ्यासाठी खूप मोठा आहे. तो मी कधी विसरणार नाही. त्यामुळे यापुढे राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याची सेवा करण्याचा प्रयत्न करीन असे त्यांनी सांगितले.











