LIVE UPDATES

Dodamarg News : शासकीय धान्य गोदामातील निकृष्ट गव्हाची चौकशी करा

साटेली-भेडशी ग्रामस्थांमधून तीव्र संताप
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 22, 2026 03:57 PM
views 39  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

दोडामार्ग :  तालुक्यातील साटेली-भेडशी येथील शासकीय धान्य गोदामातून रास्त भाव दुकानांसाठी वितरित करण्यात येत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या गव्हाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या गोदामातील कर्मचाऱ्याने दिलेल्या बेजबाबदार उत्तरामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानांतून कार्डधारकांना गहू व तांदळाचे वाटप केले जाते. वितरित होणारे धान्य मानवी वापरास योग्य आहे की नाही? याची खात्री करण्याची जबाबदारी तालुका पुरवठा अधिकारी तसेच गोदाम पुरवठा कर्मचाऱ्यांची आहे. मात्र, साटेली-भेडशी गोदामातून पुरवठा झालेला गहू इतका निकृष्ट दर्जाचा आहे की तो जनावरेही खाणार नाहीत, असा आरोप होत आहे. उसप गावात असा निकृष्ट गहू वाटप करण्यात आल्याचे समोर आले आहे.

 या प्रकाराबाबत काही ग्रामस्थांनी संबंधित पुरवठा कर्मचाऱ्याला फोन करून विचारणा केली असता, मी पोत्यात शिरून बघू का? अशी उर्मट व बेजबाबदार उत्तरे देण्यात आल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर गोदामातील गव्हाची पोती बदलली गेली आहेत का? याचा उलगडा होण्यासाठी गोदाम कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, उसप गावात ज्या कार्डधारकांना निकृष्ट दर्जाचा गहू मिळाला आहे, त्यांनी पुढे येऊन संपर्क साधावा, असे आवाहन माजी सरपंच नाईक यांनी केले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक रास्त भाव दुकानांवर अवलंबून आहेत. धान्य मोफत असले वा रास्त दरात असले, तरी ते खाण्यास योग्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे पुरवठा अधिकारी, गोदाम कर्मचारी आणि रास्त भाव दुकानदारांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.