LIVE UPDATES

Vengurla News : वायंगणीतील शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे वाटप

उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी १०० टक्के अनुदान
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 22, 2026 03:48 PM
views 50  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

वेंगुर्ला :  जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम तसेच विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप कार्यक्रम शुक्रवार दि. २० नोव्हेंबर रोजी वायंगणी येथे आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून वायंगणी गावातील शेतकरी बांधवांना वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले. पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविणे, पशुपालन व्यवसायाला चालना देणे तसेच दुग्धोत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.यावेळी पं. स. सदस्य शितल राऊत, सरपंच दत्ताराम उर्फ अवी  दुतोंडकर, डॉ. विद्यानंद देसाई, डॉ. प्रियांका टिकोरे, पशुधन अधिकारी विजय म्हापणकर, आनंद जानकर तसेच वायंगणी गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी या शासकीय योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतामध्ये वैरण उत्पादन करावे व पशुधनाचे आरोग्य आणि उत्पादन क्षमता वाढवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि पशुधन विकासासाठी शासनाचा हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.